साकीनाका आग दुघर्टना: आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

साकीनाका आग दुघर्टनेप्रकरणी फरसाण दुकानाचा मालक भानुशाली याला अटक झाली असली तरी विभागात आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता चालवण्यात येणाऱ्या फरसाण दुकानाच्या आगीला विभागातील वैद्यकीय अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधी समिती सदस्यांनी केली आहे.

वैद्यकीय अधिकारी काय करत होते?

विधी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांनी साकीनाका आग दुघर्टनेप्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. साकीनाक्याच्या आग दुघर्टनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या फरसाण दुकानांमध्येच हे कामगार राहत होते. परंतु दुकानात उभारण्यात आलेली भट्टीच अनधिकृत होती. आग प्रतिबंधक उपाययोजना याठिकाणी नव्हत्या. फरसाण बनवण्यासाठी लागणारं तेल तिथे होते, गॅस सिलेंडर होते. एवढे अनधिकृत प्रकार तिथे होत असताना विभागातील वैद्यकीय अधिकारी झोपले होते का? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला.

कारवाई करा

त्यामुळे या प्रकरणाची केवळ चौकशी करून चालणार नसून विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवरच याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. भविष्यात अशाप्रकारच्या दुघर्टना घडू नये म्हणून विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा

आगीच्या ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या होत्या. त्यामुळे अग्निशमन दलाचे मदतकार्य पोहोचण्यास विलंब झाला, असे सांगत अशाठिकाणी अनधिकृत भट्टी चालवली जात असताना विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना माहित नव्हते का? असा सवाल करत भाजपाच्या ज्योती अळवणी यांनी या हरकतीच्या मुद्दयाला पाठिंबा दिला.

यावेळी झालेल्या चर्चेत मिरांडा, हेतल गाला, सुवर्णा कारंजे, आत्माराम चाचे, जोत्स्ना महेता आदींनी भाग घेत साकीनाक्याच्या दुर्देवी घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात चीड व्यक्त केली.

पुढील बातमी
इतर बातम्या