प्रियदर्शनी सर्कल सुरू करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सायन-पनवेल महामार्गावरून प्रियदर्शनी सर्कलद्वारे चुनाभट्टी येथे जाता येत होते. मात्र गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून हे सर्कल बंद करण्यात आले आहे. परिणामी सायन-पनवेल महामार्गावरून चुनाभट्टी येथे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शनी सर्कल येथे आंदोलन केले.

सायन-पनवेल महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीला लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रियदर्शनी सर्कल बंद केले. मात्र याचा मोठा मनस्ताप चुनाभट्टीतील राहिवाशांना सहन करावा लागत आहे. येथील रहिवाशांना चेंबूरवरून चुनाभट्टी येथे जायचे असल्यास प्रियदर्शनी उड्डाणपुलाला पूर्ण वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे इंधनासह वेळेचे देखील मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रियदर्शनी सर्कल पुन्हा सुरु करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे.

याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करून देखील वाहतूक पोलीस या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी प्रियदर्शनी सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या