पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महापालिकेचं विशेष पथक महाडकडे रवाना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोकणातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे उसळलेल्या जलप्रलयाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध पातळ्यांवरून मदतीचा हात पुढे केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अशा संकटकाळी नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने बुधवारी सकाळी 7 वाजता महाडच्या दिशेने रवाना झाले आहे. 

एक बस, 2 जीप आणि आवश्यक साधनसामुग्रीसह 43 जणांच्या या पथकास महाडकडे रवाना होताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करून सक्रीय मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्या ठिकाणी माणगावच्या प्रांत प्रशांती दिघागवकर यांच्या नियंत्रणाखाली हे पथक आवश्यक ते मदतकार्य करणार आहे. 

 त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात टिकाव, फावडे, घमेली, कुदळ, पहार, काटा फावडे, कचरा भरण्यासाठी मोकळ्या गोणी, मास्क, हॅन्डग्लोव्ह्ज, गमबूट असे आवश्यक साहित्य तसेच कार्बोलिक पावडर, ब्लिचींग पावडर अशी जंतुनाशके आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड व स्प्रेईंग पम्पस देण्यात आलेले आहेत.

सन 2018 मध्येही जलप्रलयाच्या काळात कोल्हापूर भागात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने काम केले होते व त्याची दखल विविध पातळ्यांवर घेण्यात आली होती. महाडकडे रवाना झालेल्या या पथकामध्ये उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील व विजय नाईक तसेच 40 स्वयंसेवक मदतकार्य करणार आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या