मुंबईतील मोकळ्या जागा ताब्यात घ्या, स्थायी समितीची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

दक्षिण मुंबईतील प्रियदर्शनी पार्कचा ताबा असलेली संस्था क्रीडा स्पर्धांसाठी शाळांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप सपाचे गटनेते रईस शेख यांनी केला. त्यामुळे केवळ प्रियदर्शनी पार्क नव्हे, तर ज्या ज्या संस्थांना महापालिकेने आपल्या मोकळ्या जागा आंदण दिल्या आहेत आणि ज्या संस्थांकडून त्यांचा व्यावसायिक वापर केला जात आहे, त्या सर्व संस्थांकडून त्वरीत या जागा ताब्यात घेण्यात याव्यात, अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी बुधवारी केली.

३ महिन्यांत दुसरी तक्रार

खासगी संस्थांकडून महापालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे मोकळ्या जागांचा गैरवापर होत असल्याचा आरोप सपाचे गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्दयादवारे केला. दक्षिण मुंबईतील प्रियदर्शनी पार्कच्या देखभालीची जबाबदारी मलबारहिल सिटीझन्स फोरम या संस्थाकडे आहे. परंतु या संस्थांकडून आसपासच्या शाळांना क्रीडा स्पर्धेसाठी पैसे आकारले जात असून ३ महिन्यांत आपल्याकडे ही दुसरी तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शाळांना स्वत:ची मैदाने नाहीत, अशा छोट्या शाळा प्रियदर्शनी पार्कमध्ये जातात आणि त्यांची एकप्रकारे या संस्थांकडून लूट होत असल्याचा आरोप शेख यांनी केला.

मोकळ्या जागा संस्थांच्या ताब्यात

मुंबईतील मोकळ्या जागा विविध संस्थांच्या ताब्यात आजही आहेत. परंतु त्यांच्याकडून गैरवापर होतोय, अशा काही तक्रारी आल्या आहेत काय? अशी विचारणा करून त्या सर्वांवर कारवाईची मागणी आसिफ झकेरिया यांनी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेच्या सर्व उद्यान, मैदानांमध्ये नागरिकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना केली.

तसेच ज्या १७ संस्थाच्या ताब्यात क्लब, जिमखाने आहेत, तेही परत घेऊन त्यांचे धंदे करावेत. एवढेच नव्हे, तर ज्या ज्या संस्थांना मैदाने, उद्यानांसह मोकळया जागा देखभालीच्या नावाखाली बहाल केल्या आहेत, त्या सर्व ताब्यात घेऊन महापालिकेने स्वत: याची देखभाल करावी, अशी सूचना केली.

हरकतीची मुद्दा राखून

रईस शेख यांनी प्रियदर्शनी पार्कची देखभाल करणारी संस्था लोकांकडून देणगी घेऊन मैदानाचा विकास करते आणि त्याच जनतेला प्रवेश नाकारते. हे काही योग्य नसून प्रियदर्शनी पार्क संबंधित संस्थेकडून परत घेतले जावे, अशी सूचना भाजपाचे मनोज कोटक यांनी केली. केवळ प्रियदर्शनीच नव्हे, तर एनएससीआय ज्या क्लबची माफियागिरी सुरु आहे, तेही परत घेऊन त्यांचे करार रद्द करण्यात यावे, अशी सूचना कोटक यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत मकरंद नार्वेकर, सुनिता यादव यांनी भाग घेतला होता. याबाबतचा हरकतीची मुद्दा अध्यक्षांनी राखून ठेवला.

पुढील बातमी
इतर बातम्या