CCMP केलेल्या BHMS डॉक्टरांना अटींसह अॅलोपॅथीची नोंदणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र सरकारने सोमवारी शासन निर्णय (GR) जारी करत Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) पूर्ण केलेल्या Bachelor of Homeopathic Medicine and Surgery (BHMS) डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मार्फत अटींसह नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. MMCचे निबंधक डॉ. राकेश वाघमारे यांच्या माहितीनुसार, ही नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे राज्यातील CCMP पूर्ण केलेले सुमारे 12,500 होमिओपॅथी डॉक्टर अटींच्या अधीन राहून अॅलोपॅथीचा सराव करण्यास पात्र ठरणार आहेत. मात्र, यासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचा अंतिम निर्णय लागू राहणार आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागात अॅलोपॅथी डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने CCMP अभ्यासक्रम सुरू केला होता.

समिती स्थापन करण्याचे निर्देश

सरकारने या डॉक्टरांना कोणत्या उपचारपद्धती आणि वैद्यकीय प्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे.

समितीमध्ये:

  • वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त – अध्यक्ष

  • वैद्यकीय शिक्षण विभागाचे तज्ज्ञ सदस्य

  • आयुष विभागाचे प्रतिनिधी

  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे निबंधक

  • महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिलचे निबंधक

  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे निबंधक

यांचा समावेश असेल. गरजेनुसार तज्ज्ञांनाही बैठकीसाठी निमंत्रित करता येणार आहे.

ही समिती:

  • BHMS-CCMP डॉक्टरांना कोणत्या वैद्यकीय प्रक्रिया करता येतील याबाबत शिफारसी करेल.

  • निष्काळजीपणाच्या (Medical Negligence) तक्रारी हाताळण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) तयार करेल.

  • वैद्यकीय नैतिकतेसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल.

IMAचा आज 24 तासांचा संप

या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या महाराष्ट्र शाखेने मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून 24 तासांचा संप पुकारला आहे. त्यामुळे खासगी दवाखाने आणि काही खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

MARDही आंदोलनात उतरणार

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) नेही 5 ऑगस्टपासून आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील:

  • 32 सरकारी रुग्णालये

  • 16 निमसरकारी रुग्णालये

  • वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न महापालिका रुग्णालयांतील सेवा

प्रभावित होण्याची शक्यता आहे.

MARDचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी इशारा दिला आहे की, MMCने नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि सार्वजनिक रुग्णालयांतील आपत्कालीन सेवांवरही परिणाम होऊ शकतो.

IMAची भूमिका

IMAने या निर्णयावर टीका करत म्हटले आहे की, या निर्णयामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचे वैज्ञानिक तत्त्व, गुणवत्ता आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, तसेच याचा सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

होमिओपॅथी परिषदेकडून स्वागत

दुसरीकडे, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बहुबली शाह यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी हा सामान्य नागरिकांसाठी मोठा विजय असल्याचे सांगत, ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असा दावा केला.

त्यांच्या माहितीनुसार, 2025 मध्येच 2,500 हून अधिक होमिओपॅथी डॉक्टरांनी ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज केला असून, CCMP पूर्ण केलेले आणखी सुमारे 10 हजार डॉक्टर आता नोंदणीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

बेस्टची दरमहा 1,500 ई-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मिडी बसेसना मंजुरी

पुढील बातमी
इतर बातम्या