इंग्रजीतल्या विकास आराखड्याचं खापर महापालिकेच्या डोक्यावर

मुंबईचा २०१४-३४ चा विकास आराखडा मराठीतून करण्याच्या मागणीवरून राजकीय रंग चढलेला असतानाच राज्य सरकारने याचं खापर महापालिकेच्याच डोक्यावर फोडलं आहे. 'महापालिकेने विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीचा मसुदा मराठीत न दिल्यानं आम्ही तो मराठीत बनवला नाही', असं उत्तर चक्क राज्याच्या नगरविकास खात्यानं महापालिकेला दिलं आहे.

महापालिकेने विकास आराखडा हा मराठीत देऊनही सरकारकडून आता धूळफेक सुरू झाली आहे. अशा प्रकारे उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्याला हाताशी धरत अप्रत्यक्ष शिवसेनेवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

निवेदनाद्वारे केली 'ही' मागणी

मुंबईचा विकास आराखडा मराठीतून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केल्यानंतर शिवसेना त्यावरून आक्रमक झाली. मुंबईचा विकास आराखडा आणि नकाशांचे तपशील मराठीतून उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती.

पण मराठीत प्रसिद्ध नाहीच

राज्य सरकारने मुंबईचा विकास आराखडा मंजूर केल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना आणि विकास नियंत्रण नियमावली इंग्रजीबरोबरच मराठीतही प्रसिद्ध होणे आवश्यक होतं. पण मराठीत ती प्रसिद्ध न झाल्यानं मराठीच्या वापराबाबत राज्य सरकारने ७ मे २०१८ रोजी काढलेल्या आदेशाला सरकारकडूनच हरताळ फासला जात असल्याची टीका यावेळी अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिलेल्या निवेदनात केली होती.

२१ जूनला संपली मुदत

विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीबाबत हरकती दाखल करण्याची मुदत २१ जून रोजी संपली असून मराठीत मसुदा उपलब्ध नसल्यानं मुंबईतील मराठी लोकांना तो समजून घेणं आणि त्यावर आपलं म्हणणे मांडण्यात अडचण येत होती. या सर्व पार्श्र्वभूमीवर नगरविकास खात्याच्या सचिवांनी महापालिकेला पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी, मुंबई महापालिकेने विकास आराखड्याचा मसुदा मराठीत न देता इंग्रजीत दिला होता. त्यामुळे नगरविकास खात्यानेही तो इंग्रजीतून उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे.

नगर विकास खात्याचा घुमजाव

मुंबई महापालिकेने विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावली तसेच त्याचे नकाशे हे पूर्णपणे मराठीतून राज्य सरकारला पाठवलं आहे. महापालिकेच्या मंजुरीनंतर विकास नियोजन विभागाने याचा मसुदा मराठीतूनही सरकारला पाठवला आहे. मात्र, आता नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी घुमजाव करून याचं खापर महापालिकेच्या डोक्यावर फोडल्यानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिका देणार उत्तर

महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्राला महापालिकेने उत्तर देण्याची तयारी केली आहे. महापालिकेने हा विकास आराखडा मराठीतून बनवला असून तो संकेतस्थळावर प्रसिद्धही केला आहे. त्यामुळे कोण खोटं बोलतंय किंवा डोळ्यात धूळफेक करतंय हे समोर येईल. परंतु, केवळ राजकारण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर शंका उपस्थित करत दिशाभूल करू नये, असं अधिकाऱ्यांकडून बोललं जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या