एपीएमसी मार्केटमध्ये २ हजार किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबला पाहिजे यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागांमध्ये धाड टाकली जात आहे. पालिकेचे पथक प्लास्टिक पिशव्या देणारे विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक यांच्या विरोधात धडक कारवाई करत आहे. गुरुवारी एपीएमसी मार्केटमध्ये तब्बल २ हजार किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. 

गुरूवारी कोपरखैरणे विभागात स्वच्छतेविषयक पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि सहा. आयुक्त तथा कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी यांना एका फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी आढळली. त्यावर कारवाई करीत त्यांनी फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी कुठून आली याचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. 

कोपरखैरणेमधील ज्या दुकानदाराकडून त्या फेरीवाल्याने प्लास्टिक पिशव्या घेतल्या, त्या दुकानाला त्रयस्थ व्यक्ती म्हणून या अधिकाऱ्यांनी भेट दिली व प्लास्टिक पिशव्या हव्या आहेत अशी मागणी केली. त्याने त्या दिल्यानंतर कारवाई करीत त्याने कोणाकडून प्लास्टिक पिशव्या खरेदी केल्या याची माहिती घेतली आणि असा मागोवा घेत अखेरीस सेक्टर १९ ए तुर्भे येथील एपीएमसी मार्केट मधील एल.एन.ट्रेडींग कंपनीच्या दुकानात व गाळ्यात २ हजारहून अधिक किलोचा प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा हाती लागला. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साठा पकडण्याची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.  

हा साठा महानगरपालिकेने ताब्यात घेतला असून संबंधितांकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, नगररचनाकार केशव शिंदे, विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त अशोक मढवी व सुबोध ठाणेकर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे आणि इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या