मागील 24 तासांपासूनच महाराष्ट्राच्या (maharashtra) किनारपट्टी क्षेत्रामध्ये समुद्रात सुरू असणाऱ्या अनेक हालचाली पाहता त्याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे. भर मे महिन्यात राज्याला जून - जुलैप्रमाणं पावसानं (heavy rain) झोडपून काढलं आहे.
राज्यातील शेतीचे तसेच फळबागांचंही या पावसानं मोठं नुकसानही केलं आहे. पुढचे काही दिवस ही परिस्थिती सुधारणार नसून राज्यावर हे अस्मानी संकट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
राज्याच्या कोकण आणि गोवा किनारपट्टीलगत असणाऱ्या पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढच्या 36 तासात वाऱ्याची ही प्रणाली अधिक तीव्र होणार आहे. ज्यामुळं मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
या इशाऱ्यानुसार राज्याच्या रायगड आणि रत्नागिरी भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई (mumbai) आणि कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट (orange alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असल्यामुळं या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो अधिक तीव्र होत आहे. दरम्यान वादळ (cyclone) होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात शक्ती वादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यास अरबी समुद्रात शक्ती वादळ थैमान घालू शकते.
ही संपूर्ण प्रणाली उत्तरेच्या दिशेनं आगेकूच करत असून त्याच कारणास्तव महाराष्ट्रावर त्याचा थेट परिणाम होऊन रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा राज्यात जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात सोसाट्याचा वारा वाहणार असून या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल.
कोकण,पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्ये पावसाचा सर्वाधिक मारा असू शकतो. तर, पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन जलसंकटांमध्ये भर पडू शकते.
दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांतही मुसळधार पावसाची हजेरी असेलय तर, पुढील पाच ते सात दिवस विदर्भात अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळेल.
24 मे रोजी पश्चिम विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा