स्विगीचे कर्मचारी आता आठवड्यांचे ४ दिवस काम करणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधामुळे सध्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद आहेत. अशा परिस्थितीत स्विगी (Swiggy) च्या माध्यमातून होम डिलिव्हरी केली जात आहे. डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं दिलासा दिलाय. आता कर्मचारी आठवड्यातून फक्त ४ दिवस काम करतील.

कोरोना काळात स्विगी तिच्या कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आगाऊ पगाराची रक्कम, रजा एन्कॅशमेंट आणि कर्जही देत आहे. या व्यतिरिक्त कोणताही कर्मचारी कोरोनामुळे ग्रस्त असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या साथीच्या आजाराची लागण झाल्यास उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे. ग्रेड १ ते ६ च्या कर्मचार्‍यांना मे महिन्याच्या अखेरीस पगार देण्याचंही कंपनीनं ठरवलंय.

कंपनीचे एचआर हेड गिरीश मेनन यांनीही कर्मचार्‍यांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याबद्दल ईमेल पाठवलाय. ईमेलमध्ये असं लिहिलं होतं की, “आपण आठवड्यातून चार दिवस काम करायचं ठरवा आणि अतिरिक्त दिवस आपल्या कुटुंबाची आणि मित्रांची काळजी घेण्यासाठी वापरा.”

जर स्विगी कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं तर त्याला तातडीने कंपनीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येईल. हॉस्पिटलमध्ये बेड घेण्यास, आयसीयू, प्लाझ्मा, ऑक्सिजन सिलिंडर इत्यादी मिळवण्यासाठी कंपनी त्याला मदत करेल. एवढेच नाही तर कर्मचार्‍यांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय सहाय्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सहाय्यक हेल्पलाईन देखील सुरू केलीय. तसेच यासाठी अॅपही तयार करण्यात आलेय.

स्विगीनं नुकत्याच एका नव्या राऊंडमध्ये ८० कोटी डॉलर जमा केलेत. तसेच कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि आपल्या लोक असे जवळपास दोन लाख डिलिव्हरी बॉईजना लस देण्याची व्यवस्था केलीय.


पुढील बातमी
इतर बातम्या