मुंबईच्या तापमानात घट नाही, पावसाचीही विश्रांती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मागील आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना उकड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. परंतु, मागील आठवड्यात कमाल तापमानात झालेली आणि रविवारपासून किमान तापमानात झालेली वाढ अद्यापही कायम आहे. त्याशिवाय, पावसानं ही विश्रांती घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. 

मागील आठवड्यापासून मुंबईच्या हवेतील विचित्र बदल अद्यापही कायमच आहेत. बुधवारी पश्चिम उपनगरे आणि महानगर परिसरात काही तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. 

सोमवारी ३१ ऑगस्टला असलेले २९.२ अंश कमाल तापमान शुक्रवारी ३३.८ अंशावर पोहचले, तर रविवारी किमान तापमानदेखील २५ अंशावरून २८.५ अंशावर पोहचले. बुधवारी मुंबईच्या तापमानात फारसा बदल दिसला नाही. किमान तापमान कुलाबा केंद्रावर २७.५ आणि सांताक्रूझ केंद्रावर २६.६ अंश नोंदवले, तर कमाल तापमान अनुक्रमे ३३.४ आणि ३३.५ नोंदविण्यात आले.

ढगांचा गडगडाट, रात्री काही ठिकाणी विजांचे चमकणे अद्याप सुरूच आहे. बुधवारी दिवसभरात ठाणे, डोंबिवली परिसरात काही ठिकाणी ३० ते ६० मिमी पाऊस झाला, तर नवी मुंबई आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरात एक ते पाच मिमी पावसाची नोंद झाली. हवामानातील हे बदल पुढील २ दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या