मुंबईसह उपनगरातील तापमानात वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह आसपासच्या परिसरातील भागात मागील अनेक दिवसांपासून सतत उकाडा वाढत आहे. ऐन थंडीच्या दिवसांत पावसानं लावलेल्या हजेरीनंतर तापमानात वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना उकाड्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

शहर आणि उपनगरात कमाल तापमानात मंगळवारी पुन्हा एक अंशाची वाढ झाली. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागला. शनिवारपासून कमाल तापमानात वाढ होत आहे. सांताक्रूझ केंद्रावर ३५.३ अंश, तर कुलाबा केंद्रावर ३२.२ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. 

मागील १० वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाच्या नोंदी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील आहेत. तुलनेने महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात तापमान वाढीच्या नोंदी कमी आहेत. मुंबईच्या कमाल तापमानातील नोंदी तीन ते चार अंशाने अधिक असून, किमान तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशाने अधिक आहे.

गेल्या आठवड्यातील अतिवाईट हवेच्या तुलनेत या आठवड्यात प्रदूषण कमी झाले आहे. सोमवारी हवेची गुणवत्ता मोजण्याच्या आठपैकी दोन केंद्रांवर गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट, तीन ठिकाणी वाईट आणि उर्वरीत ठिकाणी मध्यम स्तरावर राहिला.

पुढील बातमी
इतर बातम्या