बीकेसी पार्किंगचा प्रश्न सुटणार का ?

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - बीकेसीच्या जी ब्लॉकमधील तीन पार्किंगच्या कंत्राटासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला निविदा मागवण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगर आयुक्त प्रविण दराडे यांनी दिली आहे. हे पार्किंग लवकर आणि कायमस्वरूपी सुरू करायचे आहे. त्यासाठी  कंत्राटदारांना निविदा भरण्यासाठी दोन दिवसांचाच अवधी देण्यात येणार आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारीलाच निविदा उघडण्यात येणार असल्याने सोमवारी बीकेसी पार्किंगचे भवितव्य ठरणार आहे.

यापूर्वी तीन वेळा पार्किंगच्या कंत्राटासाठी निविदा काढण्यात आल्या. पण कंत्राटदारांनी तीनही वेळा निविदेला ठेंगा दाखवला. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. कंत्राटदार नसल्याने हे तिन्ही पार्किंग गेल्या आठवड्यात बंद करण्यात आले होते. यासंबंधीचे वृत्त मुंबई लाइव्हने प्रसिद्ध केल्यानंतर एमएमआरडीएने खडबडून जागे होत पार्किंग सुरू केले आणि तेही मोफत. पण कायमस्वरूपी कंत्राटदार मिळाला नाही तर पार्किंग सुरू ठेवणे नियमानुसार एमएमआरडीएला शक्य होणार नाही. त्यामुळे कंत्राटदाराकडून प्रतिसाद आला नाही तर करायचे काय? असा प्रश्न एमएमआरडीएसमोरही उभा ठाकला आहे. तर कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही तर काय करायचे याचा निर्णय त्यावेळी घेऊ, असे दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या