ठाणे महापालिकेच्या बस ताफ्यात वाढ होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे (thane) महानगरपालिकाच्या (thane municipal corporation) परिवहन सेवेत लवकरच मोठी भर पडणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत 100 सीएनजी, 100 इलेक्ट्रिक आणि 10 डबलडेकर अशा एकूण 210 नव्या बस ताफ्यात दाखल होणार आहेत.

यानुसार पहिली डबलडेकर बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

सध्या ठाणे परिवहनच्या ताफ्यात 360 बस असून त्या ठाण्यासह बोरिवली, मुंबई (mumbai), भिवंडी आदी मार्गांवर धावत आहेत.

यापैकी 123 बस या वातानुकूलित इलेक्ट्रिक बस (electric buses) आहेत. या बसमधून दररोज सुमारे 2 लाख 30 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. परिवहन विभागाला दररोज सुमारे 24 ते 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

याअंतर्गत आधीच 123 इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल झाल्या असून आणखी 100 इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यापैकी पहिल्या 25 बस जून महिन्यात सेवेत येणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी परिवहनच्या अर्थसंकल्पात डबलडेकर बसचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

आता त्याची अंमलबजावणी सुरू होत असून वर्षभरात 10 डबलडेकर बस दाखल होणार आहेत. पहिली बस ठाणे ते घोडबंदर मार्गावर मे महिन्यात धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दृष्टीने 100 सीएनजी बस देखील टप्प्याटप्प्याने ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत सर्व 210 बस पूर्णपणे सेवेत दाखल होतील, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.


हेही वाचा

मुंबईत कचरा टाकणाऱ्यांवर CCTVचा ‘वॉच’

नरेंद्र डाभोळकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट

पुढील बातमी
इतर बातम्या