ठाण्यात महिलांसाठी उभारलीय पिरियड रुम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मासिक पाळीच्या आरोग्यासंदर्भात नेहमीच चर्चा होते. पण ठाणे महानगरपालिकेनं महिलांच्या आरोग्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. ठाण्यात महिलांसाठी पालिकेनं पिरियड रुम उभारली आहे. यामुळे ठाण्यातल्या चाळीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या सुटतील.

सार्वजनिक शौचालयात असा कक्ष बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचं ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. शिवाय ही रुम महिलांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

वागळे इस्टेटच्या शांतीनगर भागातील सार्वजनिक शौचालयात ही रुम महिलांसाठी खुली करण्यात आली आहे. रुमच्या बाहेरील भिंतीवर आकर्षक रंग दिला आहे. मासिक पाळी दरम्यान काय करावं आणि काय नाही याचा संदेश देणारी चित्रं काढली आहेत. पिरियड रुममध्ये एक कमोड, जेट स्प्रे, टॉयलेट रोल होल्डर, साबण, पाणी याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय एक कचऱ्याचा डबा देखील रुममध्ये ठेवण्यात आला आहे.

महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी फाउंडेशननं ठाणे इथं सर्वेक्षण केलं. त्यांनी १५ झोपडपट्ट्यांमधील १,००० महिलांना या सर्वेक्षणात सहभागी केलं होतं. पाण्याच्या कमतरतेमुळे, असुरक्षित खोल्या, मलिन नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी महिलांचे व्यवस्थापन करणं किती कठीण होतं याचा प्राथमिक निष्कर्ष यातून दिसून आला.     

फाउंडेशनच्या व्यवस्थापक नेहाली जैन म्हणतात, “आमच्या सर्वेक्षणात ठाणे इथल्या झोपडपट्टीतील ६७% पेक्षा जास्त महिलांकडे घरात शौचालयं नाहीत. यामुळे ते पूर्णपणे सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहेत. आम्हाला आनंद झाला की महानगरपालिकेनं स्वेच्छेनं काहीतरी करण्यास सहमती दर्शवली आणि आम्ही महिलांसाठी अशा समर्पित आणि सुसज्ज जागेची कल्पना संयुक्तपणे संकल्पित केली"

पिरियड रुमच्या उभारणीकरता ४५ हजार रुपयांचा खर्च आला आहे. ठाण्यातल्या सर्व १२० टॉयलेटमध्ये अशी रुम बनवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात अशा पिरियड रुम महिलांसाठी एक वरदान ठरतील यात काही शंका नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या