महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCकडून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. ठाणे शहराला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर सर्व्हिस रोड आणि अनेक अंडरपासही उभारण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वाहतूक वेगळी होऊन कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत सुमारे 75 टक्के आठपदरीकरणाचे काम पूर्ण झाले होते. उर्वरित कामाला आता वेग देण्यात आला आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाला विविध कारणांमुळे विलंब झाला असून, पूर्णत्वाची अंतिम मुदत अनेकदा बदलण्यात आली.
भिवंडी परिसरातील मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक आणि वेअरहाउसिंग वाहतुकीमुळे ठाणे-वडपे मार्गावर दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. याशिवाय नाशिक आणि समृद्धी महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचीही मोठी संख्या असते.
आठपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर ठाणे, भिवंडी, मुंबई आणि समृद्धी महामार्गादरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच प्रवासाचा वेळही कमी होण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी मार्च 2026 पर्यंत ठाणे-वडपे मार्गाचे रुंदीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य सांगितले होते. आता उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोंडीतून कितपत दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा