चर्नीरोड स्टेशनमधील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • सिविक

चर्नीरोड रेल्वे स्टेशनवरून भुलेश्वर किंवा गिरगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनो जरा सावधगिरी बाळगा. नाहीतर तुमच्या डोक्याला मार बसू शकतो. होय कारण या स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रस्त्यावरील पादचारी पूल अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे. भूलेश्वर, गिरगावच्या दिशेने जाणारा हा पूल आहे.

प्रवाशांनो काळजी घ्या

१४ ऑक्टोबर २൦१७ रोजी चर्नीरोड स्टोशनबाहेरील पादचारी पुलाच्या पायऱ्या कोसळल्या. या घटनेत एक प्रवासी जखमी देखील झाला. या घटनेनंतर गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातून बाबासाहेब जयकर मार्गावरून रेल्वे स्थानकात येणारा पादचारी पूल बंदच करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना जर या दिशेने प्रवास करायचा असल्यास या अर्धवट तुटलेल्या पुलाखालूनच प्रवास करावा लागत आहे.

रक्षक जाळीच बसवली नाही

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांच्या तक्रारीनंतर या पुलाच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पण, या पुलाचं काम करताना जी काळजी घेतली जावी ती घेतली गेलेली नाही. या अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असलेल्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. पण तरी देखील रक्षक जाळी काही लावण्यात आलेली नाही. त्यामुळे जर काम सुरू असेल तर पुलावरील एखादा दगड कुणाच्याही डोक्यात पडू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

आणखी किती वेळ लागणार?

हा पादचारी पूल बंद असल्यामुळे चर्नीरोड स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागतो. ज्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

एल्फिन्स्टन पूल दूर्घटनेनंतर खरंतर प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर ज्या पादचारी पुलांची दुरवस्था झाली आहे, अशा पुलांची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. तर, हा पूल महापालिकेच्या अख्यत्यारित येत असल्याकारणाने या पुलाचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या