देशातील सर्वात मोठे शिपयार्ड राज्यात उभारणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्याला (maharashtra) लाभलेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील संधी लक्षात घेता 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधान भवन स्थित मंत्रिपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदर विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज घेतला.

यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (nitesh rane) उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा.

यासाठी जागेची निश्चिती करण्यात यावी. तसेच जयगड, रेडी व विजयदुर्ग बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग लवकरात लवकर तयार करावा.

या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. वाढवण बंदर ते नाशिकपर्यंत (nashik) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्ग करीत आहे.

या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रभावित क्षेत्र लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करावे. बंदर विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करावे, अशा सूचना केल्या.

महाराष्ट्रात सध्या 36 प्रवासी मार्गांमधून वर्षाला 1.80 कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते.

मुंबई महानगर प्रदेशात 21 प्रवासी मार्ग असून याद्वारे 1 कोटी 60 लाख प्रवाशांची वर्षाला ये-जा होते.

प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत 21 टर्मिनलची निर्मिती करण्यात येऊन 200 नॉटिकल माइल मार्ग निर्माण करण्यात येईल.

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी बोटी पूर्णपणे इलेक्ट्रिक असाव्यात. सुरुवातीला हायब्रीड (hybrid) मॉडेल उपयोगात आणून नवीन बोटींची खरेदी करावी.

कोचीपेक्षाही मोठा मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प असणार आहे. तसेच या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


हेही वाचा

काळा घोडा सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात

गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचा होणार विकास

पुढील बातमी
इतर बातम्या