वसई-विरार (virar) महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी मंत्रालयात होणार असल्याचे जाहीर झाले आहे.
महापालिकेत बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षांनी आपले बहुमत प्रस्थापित केले असल्यामुळे त्यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जातीनिहाय अनेक नगरसेवकांनी महापौरपदाचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली असून, त्यादृष्टीने स्वतःची जमवाजमव करण्यास प्रारंभ झाला आहे.
यंदा भाजपा-शिवसेना (shiv sena) महायुतीकडे 44 असे पुरेसे मताधिक्य असल्याने त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मार्गही सुकर झाला आहे.
ही संधी मिळावी म्हणून भाजपच्या नगरसेवकांमध्येही अंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
महापौरपदाच्या निवडीनंतर होणाऱ्या उपमहापौर, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, आरोग्य समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, सभागृह नेते, पालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितींचे सभापती, विविध पक्षांचे गटनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडी आणि नेमणुकांच्या दृष्टीने सर्वच नगरसेवकांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
दिनांक 9 जुलै 2009 रोजी चार नगरपरिषदा आणि 55 ग्रामपंचायती मिळून अस्तित्वात आलेल्या वसई (vasai road) विरार महानगरपालिकेमध्ये (vvmc) पहिल्या महापौरपदाचे आरक्षण 'नागरिकांचा मागासवर्ग' पडले होते.
प्रथम महापौरपदाची अतिशय महत्त्वाची अशी ही संधी बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांचे आतेभाऊ असलेले राजीव पाटील यांना मिळाली होती.
त्यानंतरच्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण खुल्या महापौरपदाचा मान नवघर माणिकपूर क्षेत्रातून निवडून गेलेले ज्येष्ठ नेते नारायण मानकर यांना मिळाला होता.
2015 साली दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीत महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचीच सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यावेळी 'महिला राखीव' आरक्षण असलेल्या महापौरपदाची अडीच वर्षांची पहिली टर्म प्रवीण हितेंद्र ठाकूर यांनी पूर्ण केली.
तर पुढील खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्यावरही दिड वर्षांसाठी महापौरपदाचा मान रुपेश जाधव या दलित युवा कार्यकर्त्यास देण्यात आला.
तर त्यानंतरचे एक वर्ष दक्षिणात्य समाजातून आलेले, हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय प्रवीण शेट्टी यांना महापौरपदाची संधी मिळाली होती.
बविआ नेतृत्वाकडून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा भाग म्हणून प्रथम उपमहापौरपदाची संधी मुस्लिम समाजातून आलेले सगीर डांगे यांना देण्यात आली होती.
त्यानंतर उमेश नाईक या निष्ठावान पदाधिकाऱ्यास, आणि त्यानंतर ख्रिस्ती समाजातून आलेले प्रकाश रॉड्रिक्स यांना उपमहापौरपदाचा मान मिळाला होता.
शिवसेना-भाजप महायुतीस आपला विरोधी पक्षनेता बसवता येणार असून, भाजपच्या अनेक नगरसेवकांना या महत्त्वाच्या पदाची अपेक्षा लागून आहे.
नालासोपारा मतदारसंघातून नगरसेवकाचे 35 उमेदवार जिंकण्याचे श्रेय आमदार राजन नाईक यांना जात असल्यामुळे त्यांच्या मर्जी आणि इशाऱ्यावरच विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा