मान्सून केरळात दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे गुरुवारी केरळमध्ये अधिकृत आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सूनचे (monsoon) आगमन झाल्याने आता मुंबईकरांसह राज्यभरातील शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागून राहिले आहेत.

 केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल सामान्य राहिल्यास 14 जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे संचालक बिक्रम सिंग यांनी दिली.

साधारणपणे मुंबईत (mumbai) मान्सून दाखल होण्याची अधिकृत तारीख 11 जून असते. मात्र, 1 जून रोजी केरळमध्ये (kerala) मान्सून आल्यानंतर मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे 10 दिवसांचा काळ लागतो, त्यामुळे यंदा 14 जूनपर्यंत मान्सून मुंबईत धडकेल, असा अंदाज सिंग यांनी वर्तवला.

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता 6 ते 7 तारखेला मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यताही काही रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आली आहे.

तसेच त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह (maharashtra) इतर भागात पावसाला सुरुवात होऊ शकते.

पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस गोव्याच्या संपूर्ण भागात, महाराष्ट्राच्या काही भागांत तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात 7 जूनपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर केरळमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे


हेही वाचा

आसनगाव-आटगाव स्थानकांदरम्यानचा क्रॉसिंग गेट बंद

गोरेगाव-मुलुंड ट्विन टनेलसाठी TBM असेंब्ली अंतिम टप्प्यात

पुढील बातमी
इतर बातम्या