कांदिवलीवासीयांचा पाण्यासाठी आक्रोश, टँकरच्या पाण्यावर अवलंबून

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पुरेसा साठा असला तरी कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना कायमच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. काही गृहनिर्माण संस्थांना नियमितपणे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते, जे अत्यंत महागडे ठरते.

पाणी टँकर संघटना सोमवारपासून संपावर गेल्याने, शहरातील टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी बातमी फ्री प्रेस जनरलनं केली आहे. 

पालिकेने मात्र पाण्याची कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले. तलावांमध्ये अजूनही 25 टक्के साठा आहे, ज्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांना पाण्याचा पुरवठा होईल.

तथापि, ठाकूर कॉम्प्लेक्स, आशा नगर इथल्या अनेक सोसायट्यांना त्यांच्या सामान्य पुरवठ्याच्या केवळ 50 टक्केच मिळत आहे. व्हिडिओकॉन टॉवरचे रहिवासी अविनाश भुता म्हणाले, “आम्हाला फारच कमी पाणी मिळतं आणि म्हणून ते 10,000 रुपयांना विकत घ्यावं लागतं.

या समस्येमुळे संतप्त झालेल्या 20-30 रहिवाशांच्या गटाने कांदिवलीच्या आर-दक्षिण वॉर्डच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. ते म्हणाले की, अधिकार्‍यांनी त्यांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, परंतु हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

अधिका-यांनी रहिवाशांना सांगितले की बोरिवली जलाशयातील पाण्याची कमी पातळी आणि भांडुपच्या पुरवठा लाईनमधील गळती ही या भागातील टंचाईची काही कारणे आहेत.

“आम्ही अधिकार्‍यांना मालाड जलाशयातील पाणी बोरिवली जलाशयात वळवण्याची आणि ठाकूर कॉम्प्लेक्सच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली. तथापि, परिस्थिती तशीच आहे, ज्यामुळे हजारो रहिवाशांवर परिणाम होत आहे,” असे ठाकूर कॉम्प्लेक्स रेसिडेंट असोसिएशनचे संस्थापक संजय जयस्वाल यांनी सांगितले.

सहाय्यक महापालिका आयुक्त, आर-दक्षिण, संध्या नांदेडकर म्हणाल्या, “बोरिवली जलाशयात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे कांदिवलीतील काही भागात टंचाई जाणवत आहे. पालिकेचा हायड्रोलिक विभाग या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.


हेही वाचा

मुंबईत 18 आणि 19 मे ला 'या' भागांमधील पाणीपुरवठा खंडित

मुंबईसह १४ महानगरपालिकांची अंतिम प्रभागरचना १७ मे रोजी

पुढील बातमी
इतर बातम्या