नोकरदारांनो, 'एवढाच' भरावा लागेल कर!

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • सिविक

मध्यमवर्गीय खासकरून नोकरदारांना प्राप्तिकरात कुठलीही सवलत न देणारा अर्थसंकल्प गुरूवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केला. यामुळे नोकरदारांमध्ये नाराजीची भावना असली, तरी व्याजातील करात काही प्रमाणात सवलत देऊन अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना काही प्रमाणात खूश केलं आहे.

कररचना 'जैसे थे'

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१८ सालचा अर्थसंकल्प मांडताना कररचनेत कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे प्राप्तिकरदात्यांना २०१७ प्रमाणेच प्राप्तिकर द्यावा लागेल.

२०१८-१९ करीता कररचना

  • प्राप्तिकर कररचनेुसार वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांना कुठलाही कर नाही
  • २.५ लाख ते ५ लाख रुपयांदरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के प्राप्तिकर
  • ५ लाख ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के प्राप्तिकर
  • १० लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना ३० टक्के प्राप्तिकर भरावा लागेल

व्याजावरील उत्पन्नात सवलत

ज्येष्ठ नागरिकांना आता ५० हजार रुपयांपर्यंतच्या व्याजातील उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा केवळ १० हजार रुपयांपर्यंत होती. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळेल.

याच सोबत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायद्याच्या सेक्शन ८० डी अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतच्या मेडिकल खर्चावरील करसवलतीसाठी दावा करता येईल.

'स्टॅंडर्ड डिडक्शन' अंतर्गत बचत

प्राप्तिकरात स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत ४० हजार रुपयांच्या सवलती घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनमुळे साधारणत: २१०० रुपयांची बचत करता येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या