मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचानक आंदोलनामुळे गुरुवारी (6 नोव्हेंबर) सायंकाळी मुंबईकरांना मोठा फटका बसला. या आंदोलनामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा परिणाम म्हणून मशिद बंदर (Masjid Bunder) स्टेशनजवळ एक मोठा अपघात झाला, ज्यात लोकलनं 4 प्रवाशांना उडवले. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 45 वर्षांचा एक व्यक्ती आणि 19 वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी, ज्यात मोटरमन (Motorman) आणि इतर कर्मचारी सहभागी होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात सायंकाळी 5:30 वाजल्यापासून आंदोलन सुरू केले.
या आंदोलनामुळे संध्याकाळी 5:40 वाजल्यापासून कल्याणच्या (Kalyan) दिशेने जाणारी एकही लोकल धावू शकली नाही. रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबल्याने CSMT सह सर्वच प्रमुख स्टेशनवर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली.
याच गर्दीमुळे मशिद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्टेशनच्या (Sandhurst Road Station) दरम्यान धावणाऱ्या एका लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली. गर्दीचा ताण असह्य झाल्याने मशिद बंदर स्टेशनजवळ लोकलमधून 4 प्रवासी खाली पडून जखमी झाले.
आंदोलनामागचं नेमकं कारण काय?
सध्या सुरू असलेलं रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे रेल्वे प्रशासनाच्या एका कारवाईविरोधात आहे. जून 2025 मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर (Divisional Engineers) सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा