'वाघा'शी शत्रुत्व नाही, मित्रत्व करा! सरकारचा नवा संदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वाघ आणि राजकारण हे समीकरण महाराष्ट्रातील जनतेला काही नवं नाही. वाघाच्या डरकाळ्यांनी राज्यातील राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. मात्र राजकारणात वाघ आणि त्यांच्या डरकाळ्या वाढत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र खऱ्या वाघांची संख्या कमी होऊ लागली आहे. हीच बाब हेरून राज्य सरकारने मंत्रालयाच्या दर्शनी भागामध्ये वाघ संवर्धनसाठी एका उमद्या वाघाची प्रतिकृती उभारून या ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार केला आहे.

त्यामुळेच की काय मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या नकली वाघासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाहीये. त्यामुळे सरकारदरबारी वाघाशी कसेही वागा, तो तुमच्याशी प्रचंड सोशिकपणे वागतो, एवढंच काय तर शांतपणे सेल्फीही काढू देतो, असा संदेश तर सरकार जनतेला देत नाही ना? अशी कुजबूज लगेचच सुरू झाली आहे. वनमंत्री मुनगंटीवार तर वाघांच्या प्रदेशातच वावरणारे असल्याने, फायबरचे वाघ उपद्रवकारक नाहीत, या खात्रीनेच मंत्रालयाच्या उघड्या प्रांगणात वाघाला जागा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील राजकारणात वाघाशी सामना करताकरता थकलेल्या भाजपा सरकारने मंत्रालयात वाघाची प्रतिकृती उभारून सेल्फी पॉईंट बनवत वाघाला कुरवाळल्याचे पहायला मिळत आहे हेही तितकंच खरं.

पुढील बातमी
इतर बातम्या