पर्यटकांसाठी लवकरच राणीच्या बागेचे प्रवेशद्वार उघडण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या भायखळा परिसरात असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय नेहमेची पर्यटक व मुंबईकरांना आकर्षित करते. नेहमीच या राणीच्या बागेतील प्राणी व पक्षांना भेट देण्यासाठी लहानांपासून मोठ्यांची गर्दी असते. मात्र गतवर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळं राणीची बंद ठेवण्यात आली होती. परंतू, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, अनेक आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीव आता लवकरच राणीच्या बागेचे प्रवेशद्वारही उघडणार आहे.

राज्य सरकार आणि महापालिकेकडून त्यासंदर्भातील आदेश येताच पर्यटकांना लवकरच राणीच्या बागेत प्राण्यांना भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राणीच्या बागेतील जैविक विविधता, वाघ, बिबळ्या, अस्वल, पेंग्विन आदी वन्यजीवांना पाहण्याची संधी पर्यटकांना तिथली नव्यानं मिळण्याची शक्यता आहे. सध्या राणीच्या बागेत पर्यटकांना प्रवेश नाही. मात्र, तसा निर्णय झाल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राणीच्या बागेत पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. पहिली लाट ओसरल्यानंतर, सार्वजनिक उद्यानं, बागा पर्यटकांसाठी खुल्या झाल्या. तेव्हा फेब्रुवारीमध्ये राणीची बागही पर्यटकांसाठी खुली झाली आणि तिथे पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली. परंतु, पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर, सर्वच सार्वजनिक ठिकाणांवर प्रवेशबंदी लावण्यात आली. तेव्हापासून पर्यटकांना राणीच्या बागेत जाण्यास मिळालेले नाही.

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. राज्य सरकार आणि महापालिकेनं अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, राणीच्या बागेसह अन्य सार्वजनिक ठिकाणं पर्यटकांसाठी खुली होण्याची शक्यता आहे. तसा निर्णय झाल्यास पर्यटकांच्या स्वागताच्या दृष्टीने राणीच्या बागेत पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत निर्जंतुकीकरणासह अन्य उपायांचे नियोजन सुरू आहे. पर्यटकांना प्रवेश दिल्यानंतरही कुठेही गर्दी होऊ नये, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या