ठाणे मनपाचे ४ अधिकारी निलंबित, रस्त्यावरील खड्ड्यांसाठी ठरवले दोषी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे महानगर पालिकेनं अखेर आपल्या चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या चौघांवर आपल्या कामगिरी मध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

उठळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीचे उप अभियंता संदीप सावंत आणि कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड अशा चार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी आदेश काढले. या आदेशामध्ये असं देखील म्हटलं आहे की, सर्व यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून दिला असून देखील, या चौघांनी आपल्या कामामध्ये दिरंगाई केली आणि निष्काळजीपणा केल्यानेच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

नुकतंच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलूंड टोल नाका ते घोडबंदर रोड आणि मुंबई-नाशिक हायवेवरील पडघा टोल नाक्या पर्यंत रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेची पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेनं आदेश काढून या चार जणांना निलंबित केलं आहे.

गणेशोत्सवापासून ठाण्यात अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच मुख्य रस्त्यांवर देखील प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्यांचा पाहणी दौरा आयोजित करावा लागला होता.

या दौऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी विविध सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यची खरडपट्टी देखील काढली होती. शिवाय कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.


हेही वाचा

मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना कोरोनाची लागण

खड्डे बुजवण्यासाठी एकनाथ शिंदे रस्त्यावर, दिलं ‘हे’ आश्वासन

पुढील बातमी
इतर बातम्या