राणीच्या बागेतील स्वच्छता गृहाला टाळे

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बहुचर्चित पेंग्विनमुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालय (राणी बाग) सध्या गजबजलेले आहे. मात्र उद्यानातील स्वच्छतागृहाच्या कमतरतेमुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. उद्यानातील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एकमेव स्वच्छतागृहाला टाळे लागले आहे.

उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे पेंग्विन पाहण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक राणीच्या बागेला भेट देतात. त्यात स्वच्छतागृह बंद असल्याने पर्यटकांची पंचाईत होत आहे. राणी बागेत उद्यानाजवळ एक आणि उद्यान अधीक्षक कार्यालयाजवळ एक अशी दोन स्वच्छतागृह आहेत. प्रवेशद्वाराजवळील स्वच्छता गृहाला टाळे लावले असून दुसऱ्या स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. मात्र प्रवेशद्वाराजवळील स्वच्छतागृहाचा सुरक्षारक्षक सर्रास वापर करतात. पर्यटकांनी तेथे विचारणा केल्यास त्यांना मात्र मज्जाव करतात.

"प्रवेशद्वाराजवळील स्वच्छतागृहाला टाळे लावले, याबाबत मला काहीही कल्पना नाही. टाळे का लावले याची माहिती घेतली जाईल. नवीन नूतनीकरण लवकरच सुरू करण्यात येईल," असे उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या