दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणाऱ्या मुख्य अशा 'एल्फिन्स्टन ब्रिज' अर्थात प्रभादवी पुलावरील वाहतूक 12 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्रीनंतर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
हा पूल मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवा एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळेच एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत असून त्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान या पुलाच्या पाडकामामुळं प्रभावित होणाऱ्या नागरिकांना शासनानं दिलासाही दिला आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचना?
मुंबईतील वाहतूक पोलीस विभागानं गुरुवारी 'एल्फिन्स्टन ब्रिज' परिसरातील वाहतुकीसंदर्भातील काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या, जिथं वाहतूक बदलांसंदर्भातील माहितीसुद्धा देण्यात आली.
(Dadar) दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक पुलाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तर, परळ (Parel), (Worli) वरळी, प्रभादेवी (Prabhadevi), भायखळा (Bhyculla) येथील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून करीरोड आणि चिंचपोकळी पुलाचा वापर करण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे.
वाहतूक बदल?
दादर पूर्व ते पश्चिम- टिळक पूल
परळ पूर्व ते प्रभादेवी- करीरोड पूल
परळ/ भायखळा पूर्व ते प्रभादेवी- चिंचपोकळी पूल
एल्फिन्स्टन पूल बाधितांना मिळणार मोठी घरं...
मागील बऱ्याच दिवसांपासून स्थानिकांच्या विरोधामुळं 'एल्फिन्स्टन ब्रिज'चं पाडकाम प्रलंबित होतं. आता मात्र येथील प्रभावित नागरिकांना राज्य शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देण्यात आला असून, त्यांना मोठी घरं मंजूर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
एल्फिन्स्टन पूल बाधितांना म्हाडाची घरं दिली जाणार असून, बाधित 2 इमारतीतील 83 प्रकल्पग्रस्तांना यामुळं मोठा दिलासा मिळणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रभावित प्रकल्पग्रस्तांना प्रभादेवीतच म्हाडा इमारतींमध्ये 405 चौरस फूट घरं दिली जाणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा