वाहतूक कोंडीवर उपाय शोधा....

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी डी. एन. नगर ते दहिसरदरम्यान 'मुंबई मेट्रो २ए'चं काम सध्या सुरू असून ते २०१९ पर्यंत सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. ही मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मुंबई काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण

मेट्रो २ए च्या कामामुळे अंधेरी ते दहिसरदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. मुंबईकर दररोज सकाळी आणि संध्याकाळी ३ ते ४ तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात. मेट्रोच्या कामामुळे सुमारे २० किलोमीटर खोदकाम करण्यात आलेले आहे. संपूर्ण रस्त्यावर मध्यभागी खोदकाम तसेच दोन्ही बाजूला अनधिकृत डबल पार्किंग यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

'यावर लवकर उपाय करा'

रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणारी अनधिकृत डबल पार्किंगची समस्या तर हैराण करणारी आहे. मेट्रोचं काम कधीपर्यंत चालणार आहे हे माहीत नाही. पण या वाहतूक कोंडीवर ताबडतोब उपाय करण्याची गरज मुंबई काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ही वाहतूक कोंडीची समस्या अंधेरी पश्चिम येथील इन्फिनिटी मॉल, मेगा मॉल, शहीद भगत सिंग मार्ग, इनोर्बिट मॉल, मीठ चौकी जंक्शन, चारकोप, महावीर नगर, बोरीवली म्हणजेच अंधेरी ते दहिसर संपूर्ण लिंक रोड या विभागात निर्माण झाली असल्याची माहिती मुंबई काँग्रेसकडून मिळाली.

या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी ताबडतोब सर्वपक्षीय बैठक बोलवावी. या बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतीनिधींसोबत एमएमआरडीए, पोलीस, मुंबई महानगरपालिका, ट्रॅफिक पोलीस या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असावा, जेणेकरून या गंभीर समस्येवर त्वरित उपाय शोधून मुंबईकरांना दिलासा देता येईल.

- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

पुढील बातमी
इतर बातम्या