महापालिका 'या' उद्यानात उभारणार 'ट्री हाऊस'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोणत्याही पर्यटनस्थळी गेल्यावर आपल्याला एखाद्या उद्यान परिसरात ट्री हाऊस पाहायला मिळतं. काही ठिकाणी ट्री हाऊस पर्यटकांना राहण्यासाठी ही उपलब्ध असतात. एक वेगळं राहणीमान आणि वेगळा अनुभव असं काहीसं या ट्री हाऊसमध्ये राहिल्यावर वाटतं. पर्यटन स्थळांवरील हे ट्री हाऊस पर्यटकांसाठी अकर्षण असतं. आता हेच आकर्षीत 'ट्री हाऊस' मुंबईत उभारलं जाणार आहे.

'ट्री हाऊस'ची ही संकल्पना आता मुंबईतही साकारली जाणार आहे. वांद्रे बँडस्टँडवरील मुंबई महापालिकेच्या उद्यानात या 'ट्री हाऊस'चा आनंद घेता येईल. मात्र हे हाऊस फक्त पाहण्यासाठी असेल, राहण्यासाठी नाही. महापालिकेच्या नियोजन विभागातर्फे मुंबईतील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद केली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरी सुधारणांच्या कामासाठी डीपीसी प्रथमच अशा पद्धतीने निधी देणार आहे.

मुंबईतील उद्यानांचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून वांद्रे बँडस्टँड येथील पालिकेच्या उद्यानात ट्री हाऊस उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वांद्रे हा पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा परिसर आहे. या भागाला समुद्रकिनारा आहे. जवळच मिठी नदी आहे. या ठिकाणी ट्री हाऊस उभारल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकेल. झाडावर आकर्षक पद्धतीने ट्री हाऊसचे बांधकाम केले जाणार आहे. हे ट्री हाऊस लाकडापासून बनवलेले असेल. उद्यानाला भेट देणाऱ्या मुले आणि प्रौढांना ते आवडू शकेल, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या