एसटीच्या आणखी २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एक महिन्यानंतरही एसटी संपकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात राज्य सरकार अयशस्वी ठरत असल्यानं आणखी २ एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी उपोषणाला बसलेले कामगार नेते शशांक राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शेवगाव आगारात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानं विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. निलंबन-बडतर्फीची कारवाई झाल्यास कुटुंबीयांचे कसं होणार या काळजीनं दारव्हा (जि. यवतमाळ) आगारातील चालक अब्दुल जमील यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे घरी निधन झाले.

गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील तुपे यांचे आजारपणामुळे निधन झाले असून, महामंडळाकडून त्यांना पाच हजार रुपये तातडीची मदत करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.

एसटी संपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे, यासाठी गेल्या ३ दिवसांपासून उपोषणाला बसलेले संघर्ष युनियनचे शशांक राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात भरती केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील एसटी कर्मचारी सतीश जीवन दगडखैर यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते शेवगाव आगारात कार्यरत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. महामंडळानं ८६४३ कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं असून, १८९२ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. खासगी गाड्यांच्या मदतीनं संप फोडण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या