रेल्वेच्या कन्फर्म तिकिटांसाठी लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय रेल्वेची तिकिटे आपत्कालीन ‘व्हीआयपी’ कोट्यातून कन्फर्म करण्यासाठी राज्यपाल आणि लोकभवनाच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट सही आणि खोट्या शिक्क्यांचा (fake stamp) वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अशा प्रकारे प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळवून देऊन जादा पैसे उकळणाऱ्या टोळीचा मलबार हिल पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सूत्रधार आणि तीन रेल्वे एजंटना अटक करण्यात आली आहे.

राजभवनात सन 2014 पासून कार्यरत असलेले सहायक विशाल शिंदे यांना रेल्वेच्या शिफारसपत्रांच्या पडताळणीदरम्यान विसंगती आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला.

राज्यपालांच्या अधिकृत प्रवासाबाबत समन्वय साधणे, दौऱ्यांदरम्यान कुटुंबीयांना मदत करणे, तसेच लोकभवनातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन कोट्यातील तिकिटांकरिता रेल्वेकडे पत्रव्यवहार करणे, या जबाबदाऱ्या विशाल शिंदे यांच्याकडे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

6 फेब्रुवारी, 2026 रोजी मध्य रेल्वेच्या (central railway) मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांच्या कार्यालयाने दोन शिफारसपत्रांच्या पडताळणीसाठी लोकभवनाशी संपर्क साधला.

छाननीदरम्यान या पत्रांवर राज्यपालांचे तत्कालीन वैयक्तिक सहायक अभयसिंह देशमुख यांच्या बनावट सह्या असल्याचे, मजकूर बनावट असल्याचे आणि शिक्काही खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

अभयसिंह देशमुख यांनी अशी कोणतीही पत्रे पाठविली नव्हती किंवा त्यावर सही केलेली नव्हती. त्यामुळे ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत तक्रार आल्यानंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल क्रमांकांचा तपशील, पत्रव्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

अमरीश ठक्कर हा या रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती असून, इतर तीन आरोपी रेल्वे तिकीट एजंट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट कागदपत्रांचा वापर लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर एक्स्प्रेस, छपरा एक्स्प्रेससह इतर गाड्यांमध्ये थर्ड एसी बर्थ कन्फर्म करण्यासाठी केला जात होता.

पत्रांमध्ये नमूद केलेले मोबाइल क्रमांकही बनावट असल्याचे तपासात आढळले आहे. हा गैरप्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे.

तपास पुढे सरकत असताना या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा

30 जुलैपासून BMC 'ड्रग्स-फ्री मुंबई' मोहीम राबवणार

शाळांमध्ये चिप्स, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्सना बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या