मुंबई वांद्रे पूर्वमधील गरीबनगर भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या राड्यावर स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. या भागात झालेल्या हिंसक दगडफेकीनंतर आणि पोलिसांच्या लाठीमारानंतर सरदेसाई यांनी भाजपासह महायुतीतील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या राड्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी यामागे कोणाचे 'स्टंट' आहेत, हे समोर येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या विस्तारासाठी आणि रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेला या जागेची गरज होती. गेल्या 9 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ही जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनाने तोडक कारवाई सुरू केली आहे.
पश्चिम रेल्वेने ही कारवाई केली असून त्याला आपला विरोध नाही, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. या भागात रेल्वेचे अपग्रेडेशन होत असल्याचा आपल्याला आनंदच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पूर्ण प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचे काम भाजपने केले असल्याची टीका सरदेसाई यांनी केली. गरीबनगरमध्ये 2021 मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार येथील गरिबांचे हक्क जपले जावे अशी आपली मागणी आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या तिथे जाऊन केवळ स्टंट करत असून लोकांची माथी भडकवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील लोकांची माथी भडकवण्याचे काम करत असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना सरदेसाई यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, "त्यांनी बांगलादेशला ट्रेन किंवा बस पाठवली का? हे लोक इथे आलेच कसे? त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान कार्ड कसे तयार झाले?" मला कोणत्याही धर्माच्या नरेटिव्हमध्ये अडकायचे नाही, पण जो भाग स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न केला तिथे अशा प्रकारे वातावरण बिघडवणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सखोल चौकशीची मागणी
वांद्रे पूर्वेतील या दगडफेकीच्या घटनेची आणि त्यानंतर झालेल्या गोंधळाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली आहे. कोणी माथी भडकवली आणि कोणामुळे लाठीमार करण्याची वेळ आली, याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून प्रशासन सतर्क आहे.
हेही वाचा