दक्षिण मुंबईकरांचा बुधवार ठरणार कोरडा

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सिविक

बाबला टँक आणि रफी अहमद किडवाई मार्गावरील जलवाहिनीच्या जोडणीच्या कामासाठी येत्या बुधवारी २१ फेब्रुवारीला पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा ते परळमधील रहिवाशांना बुधवारी पाणी पुरवठा होणार नसून या भागातील रहिवाशांनी आधीच पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आलं आहे.

कुठल्या प्रकारचं काम?

मुंबई महापालिकेच्या भंडारवाडा जलाशय येथे जुन्या १२०० मि.मी. व्यासाच्या बाबला टँक जलवहिनीची दुरुस्ती तसेच रफी अहमद किडवाई मार्गावर नया नगर, माथारपखाडी व शिवडी कोर्ट जंक्शन येथे नवीन १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरु करण्यासाठी जुन्या जलवाहिनीसोबत जोडणी करण्याचं काम बुधवारी २१ फेब्रुवारी, २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

काही ठिकाणी कमी दाबाने पाणी

या कामासाठी भंडारवाडा टेकडी जलाशय, गोलंजी टेकडी जलाशय, फोसबेरी जलाशय १२ तासांकरीता बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे बुधवारी कुलाबा ते परळपर्यंतच्या नागरिकांना पाणी पुरवठा होणार नाही, असं जलअभियंता विभागाने स्पष्ट केलं आहे. या कामामुळे बुधवारी शहर भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येतील, असं जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितलं.

या भागात होणार नाही पाणी पुरवठा

  • 'ए' विभाग: नेव्हल डॉक, बीपीटीसह काही भाग
  • 'बी’ विभाग: पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, बी.पी.टी आदीश परिसर
  • 'ई' विभाग: बी.पी.टी., मोदी कम्पाऊंड, डी.एन.सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाऊ भोगले मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड, कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरीस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. हॉस्पिटल आदी परिसर
  • ‘एफ/दक्षिण’ विभाग: जी. डी. आंबेकर रोड, परेल मौजे (व्हिलेज), एकनाथ घाडी मार्ग, जिजामाता नगर झोपडपट्टी, आंबेवाडी, डी. जी. महाजनी रोड, टि. जे. रोड, आचार्य दोंदे मार्ग, बारादेवी, शिवाजी नगर, के. ई. एम. व टाटा हॉस्पिटल आदी परिसर
पुढील बातमी
इतर बातम्या