प्रतिक्षानगरमध्ये 10 महिन्यांपासून होतेय पाणी गळती!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनीसुद्धा तळ गाठायला सुरुवात केली असतानाच मागील दहा महिन्यांपासून सायन प्रतीक्षानगरमध्ये जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे या परिसरातील शिवशाही प्रकल्पातील इमारतीमधील नागरिकांना अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिका आणि म्हाडा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

गेल्या दहा महिन्यांपासून सायन प्रतीक्षानगर येथील सुंदर विहार हॉटेल जवळील एम 11 इमारतीलगतच्या पाण्याच्या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे. सध्या या ठिकाणी बी.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पाणी गळती संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्यापेक्षा महापालिका, म्हाडा आणि बी.जी. कन्स्ट्रक्शन प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवल्यामुळे गेल्या दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ येथे पाणीगळती सुरूच आहे. ही पाईप लाईन गटाराच्या जवळ असल्याने गटारातील पाणी त्यात मिसळत असल्याने जुन्या शिवशाही प्रकल्पातील साधारणत: 40 इमारतीतील 5 हजार रहिवाशांना कमी आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे या पाण्याला दुर्गंधीही येत आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला आहे. या पाण्यात पावसाचे पाणी आणि गटाराचे पाणी मिसळेल आणि तोच पाणीपुरवठा आम्हाला करण्यात येईल. त्यामुळे विविध आजारांचा सामना आम्हाला करावा लागेल अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाआधी येथील जलवाहिनीची गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने उपायोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे त्या ठिकाणी पूर्वी संक्रमण शिबीर होते. हे संक्रमण शिबीर 2007 साली म्हाडाच्या वतीने निष्कासित करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी असलेल्या जलवाहिन्यांना झाकण लावण्यात न आल्याने गेल्या 10 वर्षांपासून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत महानगरपालिका आणि म्हाडाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला तरीही अधिकारी वर्ग आणि कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेचे शाखा अध्यक्ष शंकर कविलकर यांनी केला आहे. तर या जलवाहिनीच्या गळतीमुळे गेल्या दहा वर्षांत येथील नागरिकांना तसा कोणताही त्रास सहन करावा लागला नव्हता. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून येथील नागरिकांना दुर्गंधीयुक्त आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यावर लवकरात लवकर प्रशासनाने तोडगा न काढल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा कविलकर यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका एफ उत्तर जल विभागातील सहाय्यक अभियंता आनंद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एम -11 इमारतीजवळील पाण्याची जी गळती होत होती त्या वाहिनीच्या दुरुस्तीची जबाबदारी ही म्हाडा प्रशासनाची होती. तक्रार आल्यानंतर पाच दिवसांपूर्वी आम्ही म्हाडाकडून दुरुस्ती करून घेतली असे सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या