काही दिवसांपूर्वी एका बातमीने सिनेजगतात गोंधळ उडाला. सिने अभिनेत्री आश्विनी एकबोटे त्यांचा कार्यक्रम सुरू असताना अचानक स्टेजवरच कोसळल्या. कुणालाच काही कळलं नाही की स्टेजवर नेमकं काय घडलं आणि बातमी आली की आश्विनी एकबोटे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं आकस्मित निधन झालं. तसंच एका मराठि वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रशांत विधाटे यांचं अचानक बदलापूर येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचं ही ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं देखील ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि सर्व सिनेसृष्टी हळहळली. या सर्व घटनांमध्ये एक साम्य आहे..आणि ते म्हणजे आकस्मित ह्रदयविकाराचा झटका.
जेव्हा ह्रदयविकाराचा आकस्मित झटका येतो तेव्हा त्या व्यक्तीला कळतही नाही. पण, अशावेळी त्या व्यक्तीसोबत कुणी असेल तर त्याने लगेचच त्या व्यक्तीची नाडी चेक करून त्याला सीपीआर म्हणजेच त्याच्या ह्रदयावर पम्पिंग करावी. पम्पिंग करणं म्हणजे त्या व्यक्तीच्या ह्रदयावर जोरात दाब द्यायचा. तसंच त्या व्यक्तीच्या तोंडात आपल्या तोंडाने श्वास द्यावा. जेणेकरुन त्या व्यक्तीला श्वास घ्यायला मदत होईल. तसंच अनेक ठिकाणी आयईडी शॉक मशिन्स उपलब्ध असते. जर ती उपलब्ध असेल तर लगेच मेडिकल ट्रिटमेंट मिळेपर्यंत त्या मशिनने ह्रदयावर दाब द्यावा. म्हणजे तो आणखी वेळ जगू शकतो. ह्रदयविकार प्रतिबंध व्हायच्या आधी आणि झाल्यानंतर आपल्या ह्रद्याचे ठोके एकदम वाढतात किंवा एकदम कमी होतात. रक्तदाब कमी किंवा जास्त होतो. ही प्रक्रिया अगदी काही सेकंदांची असते. म्हणून आपल्याला काही कळत नाही यासाठी मानसिक तणाव असलाच पाहिजे असं नाही. ह्रदयावर दाब कसा देणे, व्यक्तीला श्वासोच्छवास कशा पद्धतीने देणं या सर्वाचं प्रशिक्षण विद्यार्थांना शाळेत दिलं पाहिजे. तसंच सामान्य लोकांमध्येही याची जनजागृती केली पाहिजे.
डॉ. अंकुर फातरपेकर , हृदयरोगतज्ज्ञ
बदललेल्या जीवनशैलीमुळे, वातावरणामुळे आपल्या शरीरावर बरेच परिणाम होतात. आपल्याला काही आजारांची लक्षणे कळतही नाही. अनेकदा डॉक्टरांनाही कळत नाही की नेमकं काय झालंय? कारण, तो आजार आपल्या शरीरात कमी प्रमाणात असतो. म्हणून त्याची लक्षणे कळत नाहीत. ह्रदयविकाराचा आकस्मित झटका आला तर असंच काहीसं होतं.
बदलती जीवनशैली, अनियमित कामाची वेळ, वाढलेला रक्तदाब, मानसिक तणाव, मधुमेह अशा अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळेही ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला तर तात्काळ मेडिकल ट्रीटमेंट मिळेपर्यंत त्या व्यक्तीच्या ह्रदयावर जोरजोरात दाब द्यावा त्यामुळे त्या व्यक्तीला प्रथमोपचार मिळू शकतो. यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे.
- डॉ. गौरी दातार, हृदयरोगतज्ज्ञ