व्हायरल व्हिडिओ - झाड पडून महिलेचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात नारळाचे झाड महिलेच्या अंगावर कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील चंद्रोदय सोसायटीमध्ये राहत असलेल्या कांचननाथ (58) या गुरुवारी सकाळी मॉनिंग वॉकसाठी जात असताना सोसायटीतील नारळाचे झाड कोसळले. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना त्वरीत सुश्रुत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. कांचन नाथ या योगा टिचर होत्या.

या घटनेचा मोबाईल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेच झाड कापण्यासाठी केली होती तक्रार

हे झाड खूप जुने असल्याने ते कधीही कोसळू शकते अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तिथल्या रहिवाशांनी पालिकेकडे यासंदर्भात 17 जुलै 2017ला तक्रारदेखील केली होती. तसेच, हे झाड कापण्यासाठी आवश्यक असलेल्या 1380 रुपयांची भरणाही केला होता. महापालिकेकडे झाड कापण्याची मागणी केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी हे झाड चांगल्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र दिले.

अधिकाऱ्यांच्या मते झाड चांगले

चंद्रोदय सोसायटीने झाड कापण्याचे पैसे भरल्यानंतर एम पश्चिम विभागाच्या उद्यान विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे नारळाचे झाड सुस्थितीत असून या झाडाचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी नारळाच्या झावळ्या व नारळ त्वरीत काढून घेण्यात यावेत,असे अभिप्राय त्यांनी दिले होते.

दुघर्टनेला महापालिकाच जबाबदार

कांचन नाथ यांचे पती रजत नाथ यांनी या दुघर्टनेला मुंबई महापालिकेलाच जबाबदार धरले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाड मजबूत असल्याचा खोटा अहवाल सोसायटीला दिल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी महापालिका उपायुक्तांना पत्र लिहून निष्काळजीपणाचा आरोप महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळ झाड पडणे ही बाब नैसर्गिक असली तरी महापालिकेकडे तक्रार करूनही झाड कापले न जाणे हा महापालिकेचा अक्षम्य अपराध असून या निष्काळजीणाचाच हा बळी गेल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.


हेही वाचा -  

झाड पडल्याने एकाचा मृत्यू


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या