गर्भवती महिलेची वरळीत पोलिसांच्या गाडीतच प्रसुती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई पोलिसांच्या गाडीतच महिलेची प्रसुती झाली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. वरळी परिसरात महिलेला रस्त्यातर प्रसुतीकळा सुरु झाल्या. अखेर पोलिसांच्या गाडीतच गर्भवतीची प्रसुती झाली. वरळी नाका भागात १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास एक गरोदर महिला रस्त्यानं जात होती. अचानक चक्कर येऊन ती रस्त्यात पडली. नागरिकांनी तात्काळ या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या २ गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या.

वरळी पोलिसांना संबंधित महिला गर्भवती असल्याचं समजलं. तिला प्रसुती कळाही येत होत्या. महिलेच्यासोबत तिचे कुटुंबीय किंवा ओळखीचे कोणीही नव्हते. शिवाय रुग्णवाहिका बोलवण्या इतका वेळही पोलिसांकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी विलंब न करत महिलेला पोलिसांच्या गाडीत ठेवलं आणि नायर रुग्णालयात निघाले. गाडीमध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी अखेर गरोदर महिलेची पोलिसांच्या गाडीतच यशस्वीपणे प्रसुती केली.

त्या महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले. मात्र वेळेपूर्वीच प्रसुती झाल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर आईची प्रकृती सुरक्षित आहे. वरळी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार सपकाळ, वळवी, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, लोहार या सर्वांचं कौतुक केलं जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या