माझ्या आत्मदहनसाठी सरकार जबाबदार असेल - यशश्री पाटील

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पोलीस आणि पोलीस कुटुंबीयांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या अध्यक्षा यशश्री पाटील यांनी 1 मेला आत्मदहनाचा इशारा मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांच्या समस्या सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. मात्र ती समिती नाममात्र ठरली. त्या समितीत पोलीस पत्नी संघाच्या सदस्यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत. फक्त समितीत त्यांना सदस्य बनवण्यात आले. त्यामुळे त्यांनी येत्या 1 मेला महाराष्ट्रदिनी मंत्रालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय यापैकी एका ठिकाणी आत्मदहन किंवा विषप्राशन करणार असल्याचा इशारा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच या कृत्याला सरकार जबाबदार असेल आणि मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, असे पत्रात नमूद केले आहे.

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी पोलीस पत्नी महासंघाने आणि यशश्री पाटील यांनी वेळोवेळी आझाद मैदानात धरणे आंदोलन, बहिष्कार उपोषण केले. गेल्या वर्षी त्यांनी सलग 48 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी समिती गठीत करण्यात आली. मात्र ही समिती नाममात्र ठरली असून त्यात पोलीस पत्नी सदस्यांना कोणतेच अधिकार नाहीत. आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पाटील यांनी हे पाऊल उचलले आहे.

"समिती स्थापन होऊन दोन महिने झाले तरी आम्हाला कोणत्याही चर्चेला बोलावले नाही. फक्त मुख्यमंत्री आणि सरकारची आश्वासनाची खिरापत सुरू आहे. पोलिसांसाठी सुरू कऱण्यात येणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील कागदावरच आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आणि यंदा 1 एप्रिलला ही योजना सुरू करण्यात येणार होती. मात्र सरकारने आम्हाला एप्रिल फुल बनवले त्यामुळे हे पाऊल उचलले.

- यशश्री पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ 

पुढील बातमी
इतर बातम्या