मुलांसोबत येणाऱ्यांनाच पेंग्विनदर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - राणीबागेतील प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना पेंग्विन पाहण्यासाठी 100 रुपये प्रवेश शुल्क घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत फेटाळण्यात आला. प्रवेश शुल्क वाढीबाबत प्रशासनाकडून ठोस करणं देण्यात न आल्यामुळे पुढील दोन महिन्यांत अभ्यास करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आलाय.

प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानं पुढील दोन महिने जुन्याच दरानं प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. मात्र, राणीबागेत पेंग्विनचे दर्शन प्रौढांना मिळणार नसून 12 वर्षांखालील मुलांनाच पेंग्विन पाहता येणार आहे. 12 वर्षांखालील मुलांकडून पेंग्विन पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही, असं महापौर स्नेहल आंबेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे पुढील दोन महिने लहान मुलांनाच पेंग्विन पाहता येणार आहे.

इतर प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत राणीबागेत प्रवेश शुल्क फारच कमी आहे. त्यामुळे याचा अभ्यास करून अहवाल आणल्यास दोन महिन्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. मात्र, त्यात प्रवेश शुल्काची रक्कम अधिक नसावी, अस म्हणत सर्व गटनेत्यांसमवेत या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

'पेंग्विनच्या पिंजऱ्याचं काम 20 दिवसांत पूर्ण होईल, असं आश्वासन महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलं आहे. त्यामुळे पेंग्विनच्या पिंजऱ्याचं उद् घाटन महापालिका शाळांतून अव्वल क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते व्हावं, अशी सूचना प्रशासनाला केल्याचंही स्नेहल आंबेकर आणि यशोधर फणसे यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या