अल बरकत, स्वामी विवेकानंद हॅरिस शील्डच्या अंतिम फेरीत

हॅरिस शील्ड क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर डॉन बॉस्को संघावर मात करत अंतिम फेरीत मजल मारली.

स्वामी विवेकानंद शाळेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 189 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर निशांत कदमच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर स्वामी विवेकानंद शाळेने डॉन बॉस्कोचा डाव 146 धावांवर संपुष्टात आणत 43 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. याच आघाडीच्या बळावर त्यांनी अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या दिवसअखेर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने बिनबाद 45 धावा केल्या होत्या.

अल बरकतचा रिझवी स्प्रिंगफिल्डला दणका

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, अल बरकत इंग्लिश मिडीयम शाळेने रिझवी स्प्रिंगफिल्डसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला दणका दिला. हिमांशू शाहच्या नाबाद 163 धावांच्या जोरावर अल बरकतने 9 बाद 300 धावांवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल रिझवी स्प्रिंगफिल्डला 76 षटकांत 8 बाद 181 धावाच करता आल्या. श्रेयस मंडलिकने 47 तर मयांक तेवतियाने नाबाद 53 धावांची खेळी केली. पण सरस कामगिरीच्या आधारे अल बरकत शाळेने अंतिम फेरीत प्रवेश केला.

पुढील बातमी
इतर बातम्या