माजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचं गुरुवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. यासंदर्भातील माहिती स्टार इंडियाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. (former australian cricketer and IPL commentator dean jones passed away in mumbai)

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लिग (IPL)साठी ते स्टार स्पोर्ट काॅमेंटरी टीमचा एक भाग होते. त्याच्यासोबत ब्रेट ली, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान आणि स्कॉट स्टायरिस देखील मुंबईतून काॅमेंटरी करत होते.

डीन मर्व्हिन जोन्स यांचं गुरूवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झालं. आम्ही त्याच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत, असं स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केलं आहे.

दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ प्रयत्नशील डीन जोन्स हे किक्रेटचे खरे सदिच्छादूत होते. प्रतिभावान तरूण खेळाडूंना शोधणं आणि त्यांच्यातून नव्या दमाचे क्रिकेटर्स तयार करणं हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांनी आपल्या समालोचनाच्या माध्यमातून लक्षावधी क्रिकेटरसिकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलं. जगभरातील कोट्यवधी चाहते आणि स्टारच्या ते नेहमीच स्मरणात राहतील, अशा शब्दांत स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली आहे.

आॅस्ट्रेलियाचे माजी फलंदाज असलेल्या डीन जोन्स यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ५२ टेस्ट आणि १६४ वन डे सामने खेळले. त्यांनी टेस्टमध्ये ४६.५५ च्या सरासरीने ३६३१, तर वन डे मध्ये ४४.६१ च्या सरासरीने ६०६८ धावा केल्या. टेस्टमध्ये ११ आणि वन डेत ७ शतकं त्यांच्या नावावर होती. डीन जोन्स आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या वर्ल्डकप विजेत्या (१९८७) टीमचा हिस्सा देखील होते.

पुढील बातमी
इतर बातम्या