सुपर ओव्हरचे नियम अखेर बदलले, 'हा' आहे नवीन नियम

वादग्रस्त ठरलेल्या सुपर ओव्हरच्या नियमात अखेर बदल करण्यात आला आहे. सुपर ओव्हरच्या नियमात बदल करत असल्याची घोषणा आयसीसीने केली आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार, फायनल आणि सेमी फायनलमध्ये दोन्ही संघ समान धावसंख्या करत असतील तर सुपर ओव्हर होईल. जोपर्यंत एक संघ जास्त धावा बनवून विजयी होत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर सुरू राहणार आहे. 

आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत सुपर ओव्हरबाबत नवीन नियम करण्यात आले. सर्वाधिक चौकार मारणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्याचा नियम आयसीसीने रद्द केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रुप किंवा लीग सामन्यांमध्ये बरोबरी होत असेल तर तो सामना बरोबरीत सुटेल. मात्र, फायनल किंवा सेमीफायनलमध्ये सामना बरोबरीत होत असेल तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यांसाठीही हा नियम लागू असेल.

 सुपर ओव्हरवरून वर्ल्डकप २०१९ मध्ये मोठा वाद झाला होता. वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडविरोधात प्रथम फलंदाजी करत २४१ धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडनेही २४१ धावा करत बरोबरी केली. त्यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १५ -१५ धावा केल्याने पुन्हा बरोबरी झाली. त्यामुळे सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या इंग्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आलं.  त्यानंतर आयसीसीवर जोरदार टीका करण्यात आली होती. अखेर आयसीसीने नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची घोषणा केली. 


हेही वाचा -

BCCI च्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली


पुढील बातमी
इतर बातम्या