एमएमपीएलमध्ये जुहू हिरोजच्या प्रतिक पाटीलचे खणखणीत शतक

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर सुरू असलेल्या साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिलं शतक झळकावण्याचा मान जुहू हिरोजच्या प्रतिक पाटील याने पटकावला. रविवारी रात्री रंगलेल्या सामन्यात प्रतिक पाटीलचे शतक अाणि त्याला मिळालेली हेमल शाहची साथ यामुळे जुहू हिरोजने १७ षटकांत ४ बाद २६६ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर हे लक्ष्य गाठताना सांताक्रूझ क्रॅकर्सचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला अाणि जुहू हिरोजने तब्बल १६६ धावांनी विजयाची नोंद केली.

एमएमपीएलमधील पहिलं शतक

३३ वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी असलेल्या या स्पर्धेत प्रतिक पाटीलनं मिळालेल्या संधीचं सोनं करत एमएमपीएलमधील पहिलं शतक अापल्या नावावर केलं. सांताक्रूझच्या गोलंदाजांची अक्षरश: कत्तल करत ५१ चेंडूंत ९ चौकार अाणि ७ षटकारांची तुफानी खेळी करत प्रतिकनं नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे जुहू संघाने १७ षटकांत २६६ धावा उभारल्या. त्यात हेमल शाहनं ३३ चेंडूंत ८ चौकार अाणि ५ षटकारांसह ७७ धावांचा मोलाचा हातभार लावला.

सांताक्रूझची घसरगुंडी

विजयासाठी ठेवलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सांताक्रूझ क्रॅकर्सची अक्षरश: घसरगुंडी उडाली. सांताक्रूझच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश अाले. योगेश दळवी (३ विकेट्स) अाणि रोहिदास कोयंडे (२ विकेट्स) यांनी सांताक्रूझच्या डावाला खिंडार पाडत जुहूला दणदणीत विजय मिळवून दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या