एमआयजी क्रिकेट क्लबच्या पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकरचं नाव

ज्या मैदानावर सचिन तेंडुलकर प्रथम क्रिकेट खेळला त्या वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबमधील नवीन पॅव्हेलियनला सचिन रमेश तेंड़ुलकर असं नाव देण्यात आलं आहे. या पॅव्हेलियनचं उद्घाटन सचिनच्याच हस्ते गुरूवारी करण्यात आलं. यावेळी युवा क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स, सचिनचे मोठे बंधू अजित तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी उपस्थित होते. 

अभिमानाचा, भावनिक क्षण

सचिन आयुष्यात पहिल्यांदाच याच मैदान क्रिकेट खेळला. यावेळी सचिनने एमआयजी क्लबविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने आपल्या लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणीही यावेळी जागवल्या. एमआयजी क्रिकेट क्लब हा माझा मुख्य आधार होता असं सांगत सचिन म्हणाला की, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. जेव्हा मी ७-८ वर्षांचा होतो तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत शाळेत जात असे. माझ्या शाळेचा रस्ता एमआयजी क्रिकेट क्लबच्या जवळून जात होता. रोज शाळेतून परत येताना हे मैदान पहायला मिळावे म्हणून आम्ही मुद्दाम या रस्त्यावरून जात होतो. या मैदानावर खेळायला मिळावे अशी माझी तीव्र इच्छा होती. मी पहिल्यांदाच ज्या मैदानावर क्रिकेट खेळलो ते हेच मैदान होते. 

अजितशी सामना

एमआयजी क्रिकेट क्लबशी संबंधीत एक विशेष घटना सचिनने यावेळी सांगितली.सचिनच्या सुरूवातीच्या करियरच्या काळात या मैदानावर तो सेंटर-विकेट क्रिकेट स्पर्धा खेळला होता.  एका सामन्यात त्याला त्याच्या मोठ्या भावाचा, अजित तेंडुलकरचा सामना करावा लागला होता. या सामन्याबद्दल सांगताना सचिन म्हणाला की, आम्ही दोघे एकमेकांना सामोरे जाऊ इच्छित नसल्याने खेळणे खूपच कठीण होते. अजितने गोलंदाजीला सुरूवात केली. तो वारंवार वाईड आणि नो बाॅल टाकत होता. आणि मी बचावात्मक खेळण्यास सुरूवात केली. मात्र, मी एक बाॅल खेळलो तेव्हा अजितने माझ्याकडे रागाने बघितले. या रागातून त्याने मला माझा नैसर्गिक खेळ खेळण्याचा आदेश दिला होता. हा सामना मी जिंकला नाही पण तो हरला. शेवटी मी स्पर्धा जिंकली.

क्रिकेट प्रशिक्षण शिबीर

 तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीने (टीएमजीए) उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे.  हे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये २ ते ५ मे दरम्यान होणार आहे. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू विनोद कांबळी शिबिरात सहभागी झालेल्यांना क्रिकेटचे धडे देणार आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या