मुंबईचा राजस्थानवर ७ गडी राखून विजय

मुंबईने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. राजस्थाननं मुंबईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित मोठी धावसंख्या उभारण्यास उपयशी ठरला. त्याने १७ चेंडूत १४ धावा केल्या. मात्र क्विंटननं एक बाजू सावरून धरली. त्याने ५० चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. तर कृणाल पंड्यानेही त्याला चांगली साथ दिली. त्याने २६ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.

राजस्थानकडून ख्रिस मॉरिसनं दोन तर मुस्ताफिजुर रहमाननं १ गडी बाद केला. या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला मुंबईचा फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही. या विजयासह मुंबई आयपीएल गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. तर राजस्थानच्या संघ सातव्या स्थानावर आहे. या पराभवामुळे राजस्थानचा पुढचा प्रवास कठीण होत चालला आहे. राजस्थाननं ६ पैकी ४ सामने गमावले आहेत.

राजस्थानला आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. जोस बटलरने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल २० चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला.

राहुल चाहरनं आपल्याच गोलंदाजीवर त्याच्या झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र २७ चेंडूत ४२ धावा करून तो तंबूत परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. तर शिवम दुबे ३५ धावा करत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केलं. राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत २ गडी बाद केले.

पुढील बातमी
इतर बातम्या