प्रतिक पाटीलच्या दमदार खेळीमुळे शिवाजी पार्कला पराभवाचा धक्का

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर सोमवारी रंगलेल्या दोन्ही सामन्यात थरारक खेळाचा अनुभव क्रिकेटशौकिनांना घेता आला. शिवाजी पार्क सुपरस्टार्स आणि जुहू हिरोज या बलाढ्य संघांमध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात फलंदाजीचा उत्तम नजराणा क्रिकेटरसिकांनी अनुभवला. पहिल्या डावात अमर पाध्येच्या दमदार फलंदाजीमुळे शिवाजी पार्क सुपरस्टारने १७ षटकांत ७ बाद १६२ धावा उभारल्या. त्यानंतर प्रतिक पाटीलचे वादळ पुन्हा एकदा पोलीस जिमखान्यावर घोंघावले. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या प्रतिकने दुसऱ्या सामन्यातही वादळी खेळी करत जुहू हिरोजला साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगमधील दुसरा विजय मिळवून दिला. जुहू हिरोजने मुंबईचे १६३ धावांचे उद्दिष्ट सात विकेट्स आणि एक षटक राखून पार केले. प्रतिक पाटीलने पुन्हा एकदा ९६ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

अमर पाध्येचा धमाका

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवाजी पार्क सुपरस्टार्सने काहीशी सावध सुरुवात केली. त्यानंतर मात्र अमर पाध्येच्या झंझावाती फलंदाजीपुढे जुहू हिरोजचे गोलंदाज पुरते निष्प्रभ ठरले. शिवाजी पार्कच्या डावाची पायाभरणी करताना अमर पाध्येने दुसऱ्या विकेटसाठी केदार कांगोसह ७१ धावांची भागीदारी रचली. अमरने चौफेर फलंदाजी करताना ३९ चेंडूंत ५ चौकार आणि तब्बल आठ षटकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याने ८० धावांची खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना केदारने २३ तर किरण रामायाने याने २१ धावा फटकावल्या. त्यामुळे शिवाजी पार्कला १७ षटकांत ७ बाद १६२ धावा करता आल्या.

तीन झेल सुटले अन् सामनाही

पहिल्या सात षटकांत जुहू हिरोजच्या सलामीवीरांना नियंत्रणात ठेवण्याचे चोख काम शिवाजी पार्क सुपरस्टार्सच्या गोलंदाजांनी बजावले. त्यानंतर मात्र प्रतिक पाटील आणि त्याचा सलामीवीर साथीदार तेजस सोलंकी याने चौथा गिअर टाकला. दिनेश सावंतच्या आठव्या षटकांत या दोघांनी तब्बल २५ धावा कुटल्या आणि आपल्या संघात सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर स्वप्नम कजारियाच्या नवव्या षटकांत दोघांना जीवदान मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोघांनी तुफान फटकेबाजी केली. १८ चेंडूंत ३२ धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा प्रतिक पाटीलचा झेल सोडला. त्यामुळे एक षटक शिल्लक राखून प्रतिकने जुहू हिरोजला सलग दुसरा विजय मिळवून दिला. प्रतिकने ५३ चेंडूंत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ९६ धावा फटकावल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या