शिवाजी पार्क जिमखान्याची दादर यूनियनवर सरशी

शिवाजी पार्क अाणि दादर यूनियन हे मुंबईच्या क्रिकेटमधील एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी. या दोन्ही संघांनी देशाला असंख्य महान क्रिकेटपटू दिले. पण अाजच्या पिढीला या महान क्रिकेटपटूंचा खेळ पाहता न अाल्याची खंत जाणवत असली तरी सुनील गावस्कर, अजित वाडेकर, माधव अापटे, प्रवीण अमरे, संजय मांजरेकर यांच्यासह असंख्य रणजी क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी शिवाजी पार्कनं उपलब्ध करून दिली होती. शिवाजी पार्कवर रंगलेल्या माजी क्रिकेटपटूंच्या मैत्रीपूर्ण सामन्यात यजमान शिवाजी पार्कनं दादर यूनियनचा अवघ्या चार धावांनी पराभव करून गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढला. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा सामना दादर यूनियननं अायोजित केला होता, त्यात दादर यूनियननं शिवाजी पार्कवर विजय मिळवला होता.

शिवाजी पार्कवर प्रेक्षकांची तोबा गर्दी

पूर्वी या दोन संघांमधील सामना पाहण्यासाठी अख्खी मुंबई मैदानाभोवती जमा व्हायची. मैदानावर तेवढीच खुन्नस पण खिलाडीवृत्तीचं वातावरण असायचं. शनिवारी शिवाजी पार्कवर रंगलेल्या सामन्यातही वाडेकर, गावस्कर, मांजरेकर यांचा खेळ पाहण्यासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती. गावस्कर, वाडेकर, मांजरेकर यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठीही युवा चाहत्यांमध्ये चढाअोढ लागली होती.

शेवटच्या चेंडूवर शिवाजी पार्कचा विजय

अमोल राणे (२५), राजा अादटराव (१६), प्रवीण अमरे (११) यांच्या दमदार फलंदाजीमुळे शिवाजी पार्कने ८ षटकांत एकही विकेट न गमावता ८९ धावा उभारल्या होत्या. विशेष म्हणजे, अाठव्या षटकांत वयाची पंच्याहत्तरी अोलांडलेल्या अजित वाडेकर अाणि माधव अापटे यांनी फलंदाजीला उतरून सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. शिवाजी पार्क जिमखान्याचं ९० धावांचं उद्दिष्ट पार करताना सुरुवातीला दादर यूनियनची दमछाक झाली. पण श्रीधर मांडले (३०) या माजी रणजीपटूनं तुफान फलंदाजी करत चौकार-षटकारांची अातषबाजी केली. शेवटच्या षटकांत विजयासाठी २४ धावांची अावश्यकता असताना सलिल दातार यांनी पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार अाणि एक चौकार ठोकत सामन्यात रंगत अाणली होती. पुढच्या दोन चेंडूंवर दोन धावा निघाल्यानंतर एका चेंडूंत सहा धावांची गरज होती. मात्र अखेरच्या बाॅलवर चेंडू सीमारेषेपार भिरकावण्यात सलिल दातारला यश मिळालं नाही, त्यामुळे शिवाजी पार्कनं ४ धावांच्या फरकानं हा मैत्रीपूर्ण सामना जिंकला.

पुढील बातमी
इतर बातम्या