भारत आणि श्रीलंका पुढील वर्षी संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. विश्वचषकातील उद्घाटन सामना, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना कुठे होणार याबाबतची माहिती समोर आली आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विश्वचषकाचा पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर एक उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. अशी अपेक्षा आहे की हा टी-20 विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान पार पडेल.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमने यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे उद्घाटन आणि अंतिम सामने यजमान म्हणून पार पाडले होते. द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य सामना झाला, तर तो कोलंबो येथे खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना मुंबईत होईल.
या टी-२० विश्वचषकात श्रीलंका भारताचा सह-यजमान असेल. स्पर्धेतील सामने दोन्ही देशांतील एकूण ७ स्टेडियम्समध्ये खेळले जाणार आहेत.
भारतात सामने चेन्नई, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळले जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेत तीन मैदानांवर सामने होण्याची अपेक्षा असून, त्यात आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो), पल्लेकेले आणि दांबुला किंवा हंबनटोटा या ठिकाणांपैकी एकाचा समावेश असू शकतो.
सराव सामन्यांच्या स्थळांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. काही सराव सामने बंगळुरूमध्ये खेळवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचे सामने दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे होऊ शकतात. आयसीसी (ICC) पुढील काही दिवसांत टी-20 विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.
या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली होती. त्या बैठकीत वनडे विश्वचषकात ज्या प्रमाणात स्थळांचा वापर करण्यात आला होता, त्यापेक्षा कमी मैदानांवर टी-20 विश्वचषकातील सामने खेळवावेत, यावर चर्चा झाली. प्रत्येक ठिकाणी 6 सामने आयोजित केले जाऊ शकतात.
जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम सामना कोलंबो येथे खेळवला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे.
पाकिस्तानची टीम 2023 च्या वनडे विश्वचषकासाठी भारतात आली होती. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आयसीसीने ठरवले आहे की, भारत–पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळी केले जाईल. त्यामुळे टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
हेही वाचा