विरार ते भारताचा U-19 कर्णधार, ‘वंडर बाॅय' पृथ्वी शाॅची संघर्षगाथा

  • तुषार वैती & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रिकेट

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं नोव्हेंबर १९९९ मध्ये किवींविरुद्ध नाबाद १८६ धावांची खेळी करत वन-डेतील सर्वाधिक धावसंख्या उभारली, त्यावेळी क्रिकेटवेड्या भारतीयांनी एकच जल्लोष केला होता. बरोबर त्याच्या एका दिवसानं मुंबईपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर विरारमध्ये एका ‘वंडर बाॅय'चा जन्म झाला. १४ वर्षांनी जेव्हा सचिननं वानखेडे स्टेडियमवर अापल्या २५ वर्षांच्या अांतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला अलविदा केला, त्याच्या काही दिवसांनी याच ‘वंडर बाॅय'नं हॅरिस शील्ड स्पर्धेत ५४६ धावांची विक्रमी खेळी साकारली. हा अवलिया फलंदाज म्हणजे पृथ्वी शाॅ. रणजी पदार्पणात शतक, दुलीप ट्राॅफीच्या पदार्पणात शतक अाणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अातापर्यंत पाच शतकं नोंदवणाऱ्या पृथ्वी शाॅची प्रतिसचिन म्हणून तुलना केली जात अाहे.

वाटेवरती काटे

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अापल्या वडिलांकडूनच पृथ्वी शाॅ यानं क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय कसाबसा सुरू असताना या दोघांचा अाधार म्हणजे पृथ्वीच्या अाईचं निधन झालं अाणि या दोघांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता वडील पंकज यांनी व्यवसायाचा गाशा गुंडाळत पृथ्वीच्या क्रिकेट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. अाठव्या वर्षापासून पृथ्वीच्या खांद्यावर अालं क्रिकेट किटचं अोझं अाणि विरार ते वांद्रे (एमअायजी क्लब) हा जवळपास ७० कि.मी.चा अाणि दररोज जवळपास तीन तासांचा खडतर प्रवास. कोवळ्या वयात कीट घेऊन विरार लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या पृथ्वीचे हाल वडिलांनाही पाहवत नव्हते. सांताक्रूझ येथे एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत शाॅ कुटुंबाचे स्थलांतर झाले अाणि रिझवी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पृथ्वीच्या गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पाडण्यास सुरुवात झाली.

हॅरिस शील्डच्या विक्रमानं दिली इंग्लंडमध्ये प्रशिक्षणाची संधी

सचिन तेंडुलकर अाणि विनोद कांबळी यांनी १९८८ साली विक्रमी भागीदारी करून ज्या स्पर्धेला नावलौकिक मिळवून दिला होता, त्या हॅरिस शील्ड क्रिकेट स्पर्धेत १४ वर्षांच्या पृथ्वी शाॅने सेंट फ्रान्सिस डीअसिसी संघाविरुद्ध ५४६ धावांची खेळी करत शालेय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम अापल्या नावावर केला. त्यानंतर पृथ्वी पहिल्यांदा प्रकाशझोतात झाला. त्याच्या या कामगिरीची वार्ता सातासमुद्रापार पोहोचल्यानंतर २०१३ मध्ये त्याला 'ग्लुसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब'कडून प्रशिक्षण घेण्याचं निमंत्रण मिळालं. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेत तो 'ग्लुसेस्टरशायर'च्या दुसऱ्या संघातील सर्वात लहान क्रिकेटपटू ठरला होता. २०१४ मध्ये त्याला क्लिथोर्पस या 'याॅर्कशायरमधील कौंटी क्लब'कडून खेळण्याची संधी मिळाली. योगायोगाची बाब म्हणजे, लहान असताना याच क्लबकडून खेळणारा सचिन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

एकाच दिवशी तीन पुरस्कार अाणि गंभीर दुखापत

'मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन'चा (एमएसएसए) 'हॅरिस शील्ड'मधील एका डावातील सर्वाधिक धावांचा, 'हॅरिस शील्ड'मधील सर्वोत्तम खेळाडूचा अाणि मुंबईतील सर्वोत्तम खेळाडूचा असे तीन पुरस्कार एकाच दिवशी पृथ्वी शाॅने पटकावले. पण त्याच्या मार्गातला संघर्ष अद्यापही कायम होता. त्याच दिवशी अ डिव्हिजनमधून 'परेल स्पोर्टिंग क्रिकेट क्लब'कडून 'तालिम शील्ड' स्पर्धेत खेळताना अाझाद मैदानावर एक चेंडू दगडाला अादळून थेट त्याच्या कोपरावर अादळला. सुदैवाने डोळा वाचला, पण त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

कर्णधारपदाचा मान अाणि घवघवीत यश

मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यात अाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये दैदीप्यमान यश संपादन केले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात अाली. इंग्लंड दौऱ्यात तीन खणखणीत अर्धशतके झळकावल्यामुळे भारतानं ही मालिका ५-० अशी जिंकून इंग्लंडला 'व्हाइटवाॅश' दिला.

रणजी पदार्पणातच शतक

१ जानेवारी २०१७ रोजी तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शाॅला अंतिम संघात स्थान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अाश्चर्यकारक निर्णय संघ व्यवस्थापनानं घेतला. पहिल्या डावात पृथ्वी फ्लाॅप ठरला, पण दुसऱ्या डावात १२० धावांची खेळी करून त्यानं अापला निर्णय सार्थ ठरवला. त्यानंतर अोडिशा (१०५) अाणि अांध्र प्रदेश (११४) या संघांविरुद्ध शतक साजरे करून त्याने मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला.

'दुलीप ट्राॅफी'त विक्रमाला गवसणी

मुंबईची रनमशीन म्हणून अोळखल्या जाऊ लागलेल्या पृथ्वी शाॅने दुलीप करंडकाच्या पदार्पणातच विक्रमाला गवसणी घातली. सप्टेंबर २०१७ मध्ये लखनौ इथं रंगलेल्या इंडिया ब्लूविरुद्धच्या सामन्यात इंडिया रेडकडून खेळणाऱ्या पृथ्वीने १५४ धावांची खेळी साकारली. दुलीप करंडकात सचिन तेंडुलकरनंतर (१७ वर्ष अाणि २६२ दिवस) पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी (१७ वर्ष अाणि ३२० दिवस) हा दुसरा युवा क्रिकेटपटू ठरला.

लहानपणापासूनच मोठ्या कंपन्यांचे करार

पृथ्वी शाॅची गुणवत्ता पाहून माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी याच्या क्रीडा व्यवस्थापन कंपनीने त्याच्याशी तीन लाख रुपयांचा करार केला होता. त्यामुळे पृथ्वीला विरारहून सांताक्रूझ गाठता अाले होते. त्यानंतर महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पीएमजी कंपनीने पृथ्वीशी ३६ लाखांचा करार केला होता. अाता टायर बनवणाऱ्या एमअारएफ कंपनीने १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शाॅशी करार केला अाहे.

U-19 भारतीय संघाची धुरा

न्यूझीलंडमध्ये १३ जानेवारीपासून रंगणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा पृथ्वी शाॅकडे सोपवण्यात अाली अाहे. मुंबईचा एकमेव खेळाडू या संघात असला तरी इंग्लंड दौऱ्यातील अनुभवाचा फायदा पृथ्वीला होणार अाहे.

सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत पृथ्वी शाॅची कारकीर्द अाताशी सुरुवात झाली अाहे. प्रत्येक विक्रम पादाक्रांत करत गेल्यानंतर त्याची सचिनशी तुलना होणं स्वाभावीक असेल. मात्र अाता त्याच्यासमोर अाव्हान असेल ते भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देण्याचं. विराट कोहलीनं २०१२ मध्ये भारताला अखेरचा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला होता. त्याची064 पुनरावृत्ती करण्यात पृथ्वी शाॅ यशस्वी ठरला तर तो महान क्रिकेटपटूंच्या मांदियाळीत जाऊन बसेल हे मात्र नक्की.

पुढील बातमी
इतर बातम्या