हे काय? पोलिसांकडून तस्करांना मदत

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबई विमानतळावर दिवसेंदिवस सोने तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. याला आळा घालण्यासाठी इमिग्रेशन अधिकारी आणि पोलिसांनी गस्त वाढवत तस्करांच्या मुस्क्या आवळल्या. पण एका तपासणीत पोलिसच तस्करांना मदत करत असल्याची बाब उघडकीस आल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदारावर निलंबनांची कारवाई करण्यात आल्याची, माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रकार काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जानेवारीला दुबईतून परतणाऱ्या दोन प्रवाशांकडे नियमापेक्षा जास्त सोने होते. या दोन्ही प्रवाशांवर जनरल काऊन्टरवर इमिग्रेशनदरम्यान कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र विशेष शाखा २ द्वारे तपासणीसाठी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा वाघमोडे आणि हवालदार संदीप मोरे तैनात होते. या दोन्ही प्रवाशांना वाघमोडे यांनी ई टुरीस्ट विजा काऊन्टरवर बोलवले. त्यावेळी पासपोर्टची तपासणी करताना वाघमोडे यांनी पासपोर्टच्या खालून काही धातूसदृश्‍य वस्तू स्वीकारली. त्यानंतर प्रवासी जनरल काऊंटरच्या दिशेने गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. यावेळी तपासात संबंधीत प्रवाशांचे छायाचित्र आणि एअर तिकिटाची माहिती संदीप मोरे यांच्या मोबाईलमध्ये सापडली. 

दोघांवर निलंबनाची कारवाई

व्हॉट्‌स अॅपवरून संभाषणात एक व्यक्ती त्यांना संबंधीत प्रवाशांच्याबाबतची माहिती देत होता. त्यानंतर याप्रकरणी आणखी खोलात तपासणी केली असता मोरेने आरोपी प्रवाशांकडून धातूसदृश्‍य वस्तू स्वीकारल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. त्यावेळी माहिती देणारा व्यक्ती आपला मित्र असल्याचं त्याने सांगितलं. याप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या दोघांचाही सहभाग स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघांवर नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या